सावकाराची वेल्डरला बेदम मारहाण

तक्रार दाखल करून घेण्यासाठी फलटण शहर पोलिसांची टाळाटाळ

फलटण –
वेल्डिंगच्या व्यवसायासाठी सुमारे वर्षभरापूर्वी शेकडा दहा टक्के व्याजाने घेतलेल्या पन्नास हजारांच्या बदल्यात 60 हजार रुपये देऊनही फलटण येथील सोमवार पेठेतील एका अवैध खासगी सावकाराने वेल्डर उमेश प्रमोद आवळे याला बेदम मारहाण करुन जखमी केले आहे. याबाबत संबंधित पीडित फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन देण्यासाठी गेला असता फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करुन त्यास ठाण्यातून पिटाळल्याची घटना फलटण येथे घडली आहे.

उमेश प्रमोद आवळे (वय 23) रा. सोमवार पेठ, फलटण यांचा वेल्डिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी उमेश यांनी अर्जून सुरेश पवार व अक्षय यल्लप्पा पवार दोघेही रा. सोमवार पेठ, फलटण यांच्याकडून एक वर्षापूर्वी दहा टक्के व्याजाने 50 हजार घेतले होते. आवळे यांनी वेळोवेळी सुमारे 60 हजार रुपये अर्जून व अक्षय पवार यांना दिलेले होते. मात्र, दि. 21 रोजी सायंकाळी श्रीराम कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उमेश आवळे व अक्षय लांडगे यांना अर्जून पवार व अक्षय पवार यांनी अडवून बेदम मारहाण केली व व्याजाच्या पैशाची मागणी केली.

यावेळी आवळे यांनी मी तुमचे सर्व पैसे दिलेले आहेत, आता देणे लागत नाही, असे सांगितले. त्यावेळी अर्जून पवार व अक्षय पवार यांनी जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यानंतर आवळे व लांडगे हे फलटण शहर पोलिस ठाण्यात गेले असता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद दाखल केली आहे. पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे व गुन्हा दाखल न झाल्यास अधिकारगृहासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा पिडीतांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)