आर्थिक टंचाईतील पाकिस्तानला सौदीच्या गुंतवणूकीचा आधार

दुबई : आर्थिक टंचाईमुळे अडचणीत आलेल्या पाकिस्तानला गुंतवणूकीद्वारे आधार देण्यासाठी सौदी अरेबियाने पुढे पाऊल टाकले आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानातील तेलशुद्धीकरण कंपनीमध्ये 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्‍चित केले आहे. संरक्षणदृष्ट्या महत्वाच्या ग्वादर बंदरातील या रिफायनरीमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. पाकिस्तानसाठी महत्वाच्या असलेल्या चीन पाकिस्तान आर्थिक कोरिडॉरचे एक टोक या बंदरापर्यंत पोहोचणार आहे. भारताच्या सहकार्याने इराणमध्ये उभारण्यात येत असलेल्या चाबहार बंदरापासून ग्वादर बंदर दूर नाही.

सौदीच्या स्रोतांनी या गुंतवणूकीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी लवकरच इस्लामाबादला भेट देण्याचेही निश्‍चित केले आहे. मात्र त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. याशिवाय सौदीच्या माध्यमातून आणखी काही मोठ्या प्रकल्पांवरील गुंतवणूकीची घोषणाही युवराजांच्या भेटीदरम्यान होण्याची शक्‍यता आहे.

सौदी अरेबिया आणि सयुक्‍त अरब अमिराती हे मध्यपूर्वेतील प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. त्या दोन्ही देशांनी पाकिस्तानला 30 अब्ज डॉलर गुंतवणूक आणि कर्जाची हमी दिली आहे. संयुक्‍त अरब अमिरातीने 3 अब्ज डॉलरची मदत पाकिस्तानकडे सुपूर्तही केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)