पुणे – ‘सत्संगी’ शिष्य नव्हे; घरफोडे, वाहनचोर

दोघांना अटक : 20 गुन्हे उघड; 11 लाखांचा ऐवज जप्त

पुणे – चोऱ्या करताना पकडले जावू नये, कोणाला संशय येऊ नये, यासाठी आळंदी येथील सत्संगामध्ये ते दोघे रहायचे. रात्री कामाच्या बहाणा करून बाहेर पडून शहरात घरफोड्या, वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्यांना हडपसर पोलिसांनी चलाखिने पकडले. त्यांनी 20 गुन्हे केले असल्याचे उघड झाले असून सोन्याचे दागिने, दुचाक्‍या, मोबाइल आदी सुमारे 11 लाखांचा ऐवज पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सागर दत्तात्रेय भालेराव (वय 21) आणि स्वप्निल नामदेव गिरमे (वय 24, रा. हडपसर दोघे रा. मांजरी, हडपसर सध्या रा. देवाची आळंदी) असे अटक केलेल्या दोघांचे नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हडपसर भागात मागील काही महिन्यांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर पोलीस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, आळंदी येथील सत्संग शिबिरामध्ये राहणारे युवक हडपसर परिसरात चोऱ्या करीत आहेत. तसेच, सोन्याचे दागिने विक्रीसाठी हडपसर भागात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हडपसर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (दि.7) सापळा रचला आणि मंत्री मार्केट येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी दागिन्यांची चोरी केल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून घरफोडी, वाहनचोरी, चोऱ्या आदी वीस गुन्हे उघडकीस आणले. त्यात हडपसर 14, सहकारनगर 2 आणि मुंढवा, वानवडी, चंदननगर आणि दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 गुन्ह्याचा समावेश आहे. तसेच 131 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 5 दुचाकी, 10 मोबाइल फोन, 2 एलसीडी टिव्ही, 1 कॅमेरा आणि 26 हजार रुपयांची रोख रक्‍कम असा 11 लाखांचा ऐवज जप्त केला.

सहायक आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक मंगेश भांगे, कर्मचारी नितीन मुंढे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, शशिकांत नाळे, सैदोबा भोजराव, नवले, टिळेकर, पठाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

गत दोन वर्षांत दाखल चाळीस गुन्हे
सागर आणि स्वप्निल हे सराईत गुन्हेगार आहेत. गत दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 40 गुन्हे दाखल आहेत. गुन्हा केल्यास पोलीस घरी येऊन पकडतील या भीतीने ते दोघे मागील दोन ते अडीच महिन्यांपासून आळंदी येथील सत्संग शिबिरात राहात होते, अशी माहिती परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)