रस्त्यांच्या कामांमुळे सातारकरांची कोंडी नित्याचीच

शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची असून अडचण नसून खोळंबा स्थिती
गुरूनाथ जाधव

सातारा  –
सातारा लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला.आचारसंहिता लागु झाली सर्वत्र पळापळ सुरू आहे. मात्र यात सातारकरांना वाहतुकीसाठी आवश्‍यक असणाऱ्या रस्त्यांची असुन अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये वाहतूक शाखेच्या शिस्तीपेक्षाही नागरिकांच्या स्वयंशिस्तीचा अभावच जास्त पहायला मिळत आहे.
शहरातील ग्रेड सेपरेटरचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सध्या पोवई नाका ते दुधसंघाचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला असला तरी उरलेल्या रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे बहुतांश उर्वरित रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीचे चित्र दिसत आहे.

सध्या उन्हाचा तडाका आणि त्यामध्ये रस्त्यामध्ये बेशिस्त पध्दतीने वाहनांचे केले जाणारे पार्किंग ही मोठी समस्या बनली आहे. शहरातील परिस्थिती माहित असुन काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे इतरांना वाहतुकीच्या कोंडीत तासन्‌ तास खोळंबुन अडकून बसावे लागत आहे. रविवार पेठेतुन पोवईनाक्‍याकडे येण्याच्या मार्गावर अडथळा ठरणारा रिक्षा स्टॉप हलवल्याने मोठया प्रमाणावर वाहतुकीला सहकार्य झाले त्याचप्रमाणे आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मधल्या रस्त्यावर करणे अत्यावश्‍यक बनले आहे.

या रस्त्याकडून पुढे जाणाऱ्या रस्त्यावरती तिच अवस्था दिसत आहे. अजिंक्‍यमुद्रणालय ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा एकमेव रस्ता आता बहुतांश सातारकरांच्या दैनंदिन वाहतुकीचा रस्ता आहे. या रस्त्यावरती चारचाकी तसेच दुचाकी पार्किंग केलेल्या वाहनांमुळे तासन्‌ तास वाहतुकीची कोडी होत असल्याचे दिसत आहे. यामध्ये वादावादीचे प्रकार देखील घडत आहेत. मुळात या परिसरात असलेल्या कार्यालये, दुकाने, यांना पार्किंग करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने हा प्रकार होत आहे. मात्र सद्य परिस्थितीत या रस्त्यावरती शिस्त लावणे हे वाहतुक शाखेसमोर आवाहन ठरणार आहे.

पोवई नाका महाराजा हॉटेल मागील बाजुने मोनार्क चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा वाहतुकीसाठी मार्ग आहे. यातुन नागरिकांची दैंनंदिन वाहतुक सुरू आहे. रस्ता शोधत मिळेल त्या वाटेने करावी लागणारी कसरत आता बहुताश सातारकरांना परिचित आहे. मात्र नव्याने सातारामध्ये येणाऱ्या पाहूण्यांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर वाहतुकशाखेच्या वतीने लावण्यात आलेल्या बेशिस्त वाहनांना क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात येते तर चारचाकी वाहनांना जामर लावण्यात येत आहे. तरी देखील या ठिकाणची परिस्थिती जैसे थे पहायला मिळत आहे.

एकीकडे निवडणुकांची धामधूम शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असुन नागरिकांना तसेच शहरातील वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीचे व्यवस्थापन प्राधान्याने करताना वेगळया पध्दतीने आखणी करून काम करणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे झाले आहे. बहुतांश रस्त्याच्या ठिकाणी वाहतुक कर्मचारी यांची नियुक्ती करून या प्रकारामध्ये सुसूत्रता आणता येऊ शकते. तसे करणे अत्यंत आवश्‍यक बनले आहे. आज सातारा शहरात विविध रस्त्यांची एकप्रकारे नाकेबंदीच झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र याला सुस्थितीत आणण्यासाठी वाहतुक शाखेने कंबर कसल्यास वाहतुकीला शिस्त लागेल व नागरिकांची होणारी गैरसोय नक्कीच टळेल. सध्या सातारकर ज्या परिस्थितीतून जात आहेत ती परिस्थिती फारशी सुखावह नाही. पार्किंगसाठी जागा नाही. फुटपाथ कधीच टपरीचालकांच्या मालकीचे झाले आहेत. धुळ आणि धुरांने अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणाऱ्यांच्या दुचाकी गाड्या नेणारी क्रेन एका ठिकाणाहुन किती वेळा फिरणार हा देखील प्रश्‍न आहे.

कामाच्या ठिकाणी कंपनीने लावलेल्या पत्र्यांच्या आडोशाने दुचाकी वाहने कशीबशी जात असताना वाहने ज्या चिंचोळ्या रस्त्याने जातात ते रस्ते आणि त्या मार्गांवर वाहतूक कोंडी होणार नाही याची व्यवस्था नगर पालिका आणि संबंधित खात्याने करणे आवश्‍यक बनले आहे. सातारकरांनी ही सगळी जबाबदारी केवळ सरकारी खाते आणि नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थेची आहे असे समजणे आता बास करावे. एकपदरी मार्ग केल्यावरही दुचाकी स्वार ज्या पध्दतीने गाड्या चुकीच्या मार्गाने नेतात किंवा तिथे नेमलेल्या संबंधितांना अरेरावी करत मार्ग काढतात त्यावर ही चांगला इलाज केला पाहिजे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)