“सावित्री’च्या सादरीकरणाने सातारकर मंत्रमुग्ध

सातारा – मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये पु. शि. रेगे यांच्या “सावित्री’ या पत्रात्मक कांदबरी आधारित “सावित्री’ हा एकपात्री नाट्याविष्कार अभिनेत्री प्रिया जामकर यांनी सादर केला. जवळपास दीड तास त्यांनी केलेल्या सादरीकरणामुळे सातारकर मंत्रमुग्ध झाले.

“सावित्री’ ही पत्ररूप कादंबरी. अवघी 49 पत्रं असलेली. आकार छोटा, पण अवकाश मोठा अशी आईविना वाढलेल्या, तरुण बुद्धिमान मुलीच्या विचारविश्‍वाचा, भावभावनांचा पस मांडणारी सुरुवातीला मुग्ध आणि नंतर परिपक्व होत जाणाऱ्या तिच्या प्रेमाचा प्रवास सांगणारी ही कादंबरी. “सावित्री’ सादर करणाऱ्या अभिनेत्री प्रिया जामकर या पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयात मराठीच्या विभागप्रमुख आहेत. अत्यंत बोलके डोळे, लवचिक आवाज, नृत्याची जाण असल्यामुळे लयबद्ध हालचाली, कवयित्री असल्यामुळे “सावित्री’मधली तरलता समजून घेण्याची क्षमता आणि अभिनयाची मुळातच असलेली आवड या सगळ्या गोष्टी त्यांना “सावित्री’ उत्तमरित्या साकारली.

मुळात हा सगळा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी साधलेला संवाद. तो निव्वळ नाट्यवाचन या स्वरूपात न करता एकपात्री प्रयोग या स्वरूपात सादर केला आहे. रंगमंचावर जवळजवळ दीड तास एकच व्यक्ती वावरणार असते तेव्हा सगळ्या गोष्टी त्यांच्यावरच अवलंबून असतात. त्यांचा वावर, त्यांच्या हालचाली, त्यांचा आवाज, त्यांचा अभिनय या सगळ्याच गोष्टींवर प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. या सगळ्याच बाबतीत “सावित्री’ अशीच असणार असं वाटावं या ताकदीने अभिनेत्री प्रिया जामकर यांनी “सावित्री’ सादर केली. हे सादरीकरण सुरु असताना जवळपास दीड तास पाठक हॉलमध्ये शांतता होती प्रेक्षकही त्यांच्या सादरीकरणात एकरुप होऊन गेले होते त्यामुळेच प्रयोग संपल्यानंतर दहा मिनिटे टाळयांचा कडकडाट होत राहिला.

प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रंसचालन ऍड. चंद्रकांत बेबले यांनी केले. प्रास्ताविक किशोर बेडकिहाळ यांनी तर आभार अजित साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमास सातारकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान मराठी भाषा पंधरवडयांचा समारोप 17 मार्च रोजी रविवारी सायंकाळी 6 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार असून यावेळी सातारकर रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)