बासुंदी चहाला चोखंदळ सातारकरांची पसंती…

 गुरूनाथ जाधव

चहा या पेयाला सार्वत्रिक मान्यता असून जनमानसाची त्याला पहिली पसंती लाभली आहे. पै-पाहुण्यांचे आदरातिथ्य चहापानाने होते. तो एक दैनंदिन संस्कृतीचा भाग बनला आहे. ही संस्कृती व्यवसायात सचोटीने रुजवत, आपण देखील बासुंदी चहाची विक्री पुणे, मुंबई तसेच परदेशात करणार असे स्वप्न पहाणाऱ्या अरूण जाधव यांची संघर्षकथा प्रेरणादाई आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मु. पो. जळगाव ता. कोरेगाव जि. सातारा येथील शेतकरी असलेल्या अरूण अंकुश जाधव यांनी बासुंदी चहाच्या विक्रीची सुरूवात सातारा शहरात प्रथम केली. शेती व्यवसाय करत असताना सोबत जोड व्यवसाय म्हणून आपल्या कुंटूबाच्या चरितार्थ चालवण्यासाठी हा व्यवसाय चालवण्याचा जाधव कुंटूबीयांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पोवई नाका पोस्ट ऑफिस शेजारी जाधव बासुंदी चहा ही सातारकरांच्या पसंतीचे एक नाव ठरत आहे. येता जाता अनेक लोक या बासुंदी चहाची चव चाखायला गर्दी करतात.

ट्रॅक्‍टरचा व्यवसाय करत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. टोळी वाल्यांकडून पैसे मिळेनासे झाले. आर्थिक अडचणींचा सामना करताना परिस्थितीला शरण न जाता आपण काहीतरी करणे आवश्‍यक होते. संसाराचा गाडा सांभाळताना कौटूंबिक गरजा त्याची जबाबदारी पेलण्याची क्षमता नेहमीच बळ देत होती. त्यातूनच मावस भावाच्या मदतीने व मुलांच्या जिद्दीने या व्यवासायास सुरूवात केली. अपयशाने खचायचं नाही आणि कष्टाला कमी पडायचं नाही हा एकच मंत्र मुलांना दिला व त्यांनी तो अंमलात आणला.

पन्हाळा तीर्थक्षेत्र जोतीबा येथे अकरा वर्षे बासुंदी चहा विक्रीचा व्यवसाय सुरेश कदम करत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन घेवून व्यवसायास सुरूवात केली. अरूण जाधवांचे ते मावस भाऊ आहेत. अरूण जाधव यांना दोन मुले. मोठा मुलगा ओंकार व धाकटा अक्षय. या दोन्ही मुलांनी हा व्यवसाय सांभाळला आहे. सुरूवातीला आपल्या काकाकडे जावून बासुंदी चहा बनविण्याचे सर्व कौशल्य ओंकार याने आत्मसात केले. आणि नंतर ते आपल्या भावाला देखील शिकवले. दोघेही उच्च शिक्षित असले तरी हा व्यवसाय जिद्दीने करत आहेत. चांगल्या पध्दतीचे दूध व चहा बनविण्याच्या दर्जेदार पध्दती व साहित्याचा वापर करून दुधापासून बासुंदी चहा बनवला जातो. एका वेळेस किमान चार पाच कप बासुंदी चहा सातारकर पित आहेत. कोणतेही काम हलकं किंवा कमी दर्जाचे नसते असे मानणारी ही दोन्ही मुले आपल्या वडिलांसोबत हा व्यवसाय करत आहेत. सुरूवातीला हातामध्ये किटली, थर्मास घेवुन चालत जाऊन शहरातील विविध कार्यालयांमध्ये चहा विक्री केली होती. आज दुकानाचा व्याप वाढला असून व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)