सातारच्या मातीने दिले स्वराज्यासाठी दोन सरनौबत

साताऱ्याचे मालोजी घोरपडे, हरजीराजे महाडिक, जैताजी काटकर आदी शिलेदारांचेही योगदान
दीपक देशमुख

सातारा – छत्रपती शिवरायांच्या सैन्यात पायदळ, घोडदळ आणि आरमार या तिन्ही दलाचा प्रमुख असणारे सरनौबत पद अत्यंत महत्त्वाचे पद होते. सातारा जिल्ह्याने स्वराज्यासाठी दोन सरनौबत दिले, ही जिल्हावासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. भोसरे (ता. खटाव) येथील कुडतोजी तथा प्रतापराव गुजर आणि तळबीड, ता. कराड येथील हंबीरराव मोहिते या लढवय्या सेनांनींनी शिवरायांच्या विचाराने प्रेरित होवून स्वराज्यासाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच मालोजी घोरपडे, हरजीराजे महाडिक, जैताजी काटकर यांच्यासह अनेक शूर शिलेदार मावळ्यांनी स्वराज्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे.

खटाव तालुक्‍यातील भोसरे गावातील कुडतोजी तथा प्रतापराव गुजर हे छत्रपती शिवरायांचे तिसरे सरनौबत. मिर्झाराजे जयसिंगाविरोधात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाबद्दल छ. शिवरायांनी त्यांना प्रतापराव हा किताब दिला. बाजी पासलकर एका लढाईत मारले गेल्यानंतर बारा मावळातील सर्व देशमुख-पाटील यांना बांधण्याचे आणि स्वराज्याशी जोडण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम प्रतापराव गुजर यांनी केले आहे. 1674 मध्ये प्रतापराव गुजर यांना बहलोल खानचा बिमोड करण्यास पाठवण्यात आले. मराठ्यांच्या सैन्याने खानाच्या सैन्यास उमराणी येथील लढाईत पराभूत केले. बहलोल खान याने शरण येवून पुन्हा स्वराज्यावर हल्ला न करण्याचे वचन दिले. त्यामुळे प्रतापरावांनी त्यास सोडून दिले. मात्र, ही गोष्ट समजताच छत्रपती शिवरायांनी बहलोल खान सोडला, तो पुन्हा स्वराज्यावर चालून येईल, असा निरोप पाठवत नाराजी व्यक्त केली. पुढे कोल्हापूरजवळील नेसरी येथे बहलोल खान असल्याची खबर मिळताच त्यांनी अवघ्या सहा शिलेदारासह सुमारे पंधरा हजार सैन्यावर हल्ला केला. या लढाईत सातही वीर मारले गेले.

प्रतापराव गुजर यांच्यासह हंबीरराव मोहिते यांनीही स्वराज्यासाठी मोठे योगदान दिले आहे. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा शहाजीराजे यांच्याशी संबंध येवून धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजीराजेंच्या लष्करात सहहवालदार होते. मोहिते घराण्याची छत्रपती घराण्याशी सोयरीकही होती. पुढे छ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.

हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय होता. छ. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी पराक्रम गाजवला. वाईजवळच्या लढाईत त्यांनी सर्जाखानाचा पराभव केला परंतु तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले. छ. शिवरायांच्या दोन शूर सरसेनापतींनी स्वराज्यासाठी लढताना प्राणांची बाजी लावली. त्यांचा पराक्रम साताराच नव्हे तर संपूर्ण देशाने अभिमान करावा असाच आहे. या शूर योद्‌ध्यांची स्मारके युवापिढीला स्फूर्ती देत आहेत.

साताराच्या मातीने छ. शिवरायांच्या कार्यात खूप मोठे योगदान दिले आहे. यामध्ये प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते यांच्यासह महाराणी ताराबाई, महाराणी सोयराबाई, महाराणी येसुबाई यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. स्वराज्याची पहिली लढाई शिरवळजवळील सुभानमंगलजवळ झाली आहे तर दुसरी निर्णायक लढाई प्रतापगडाच्या पायथ्याशी होवून स्वराज्य स्थापनेचा पाया बळकट झाला आहे. जावळी खोरे हे जगातील उत्तम लढाईचे क्षेत्र आहे. जावळीचे महत्त्व छ. शिवरायांनी हेरले होते. त्याचा योग्य उपयोग करून त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ साताऱ्यातच रोवली. छत्रपती शिवरायांचे कार्य समाजापुढे नेण्याचे कार्य माझ्या हातून होते, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे.
– प्रतापराव गंगावणे ,लेखक,  इतिहास अभ्यासक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)