सातारा, माढ्याची जागा निवडून आणणारच

ना. रामराजेंनी दिली गॅरंटी : त्यांच्या मतांची बेरीज कधीच केली नव्हती

सातारा – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील राजेअंतर्गत ताणतणाव मिटताना दिसून येत आहे. शनिवारी खा.उदयनराजे व ना.रामराजे यांनी एकत्रित पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी साताऱ्यासह माढ्याची जागा निवडूण आणणार अशी गॅरंटी देतो, असे ना.रामराजे यांनी सांगितले. तर खा.उदयनराजेंनी रामराजेंनी केलेल्या बॅटींगवर दिलखुलास दाद देत आमच्यात ताणतणाव कधीच नव्हता, असे स्पष्टीकरण दिले.

राष्ट्रवादी भवन येथे सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ना.रामराजे म्हणाले, सातारा आणि माढ्यातील दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन केले. त्यावर पत्रकारांनी शासकीय विश्रामगृह येथील तणावाच्या घडलेल्या घटनांचा दाखला देत, तुम्ही आणि खा.उदयनराजे एक दिलाने एकत्र आला आहात का ? असे विचारताच ना.रामराजे म्हणाले, त्यावेळी कोणताही ताणतणाव नव्हता. माझा मी माझ्या दालनात बसलो होतो. खासदार त्यांच्या स्टाईलने आले आणि गेले. सध्या माझ्यावर संपुर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दोन्ही जागा निवडून आणणार आहे.

दरम्यान, रणजितसिंह ना.निंबाळकर व आ.जयकुमार गोरे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चाबाबत छेडण्यात आले. त्यावर ना.रामराजे म्हणाले, अद्याप पक्षप्रवेश झालेला नाही. मात्र, त्यांच्या जाण्याने माढ्यात फार फरक पडणार नाही. कारण, फलटण आणि माण मतदारसंघातील त्या मतांची आम्ही कधीच बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार केला नव्हता. मात्र, सध्या आम्हाला दुष्काळातील होडी प्रेमाची आठवण करून दिली पाहिजे, असा टोला ना.रामराजे यांनी लगावला.
खा.उदयनराजे यांनी यावेळी भाजपवर सडकून टीका करताना म्हणाले, मागील पाच वर्षात देशाची दूरवस्था झाली.तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करून लोकांची दिशाभूल सरकारने केली. त्यामुळे साताराच नव्हे तर देशातील सर्वच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना मतदारांनी निवडून दिले पाहिजे.

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी, व्यापारी भरडला गेला. आता धोरणांचा विपरित परिणाम होत असताना केवळ मागे हटायचे नाही, म्हणून धोरणांचे समर्थन करण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसून येतोय. दरम्यान, पाच वर्षात भाजपकडून घेत असलेल्या निर्णयाबाबत आपण संसदेत आवाज का उठवला नाही ? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर खा.उदयनराजे यांनी मागील पाच वर्षात पंतप्रधानांनी एक तरी पत्रकार परिषद घेतली का ? असा प्रतिसवाल उपस्थित करत विरोधकांचा आवाज पत्रकारांच्या माध्यमातून समाजात पोहचला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सत्तांतर झाले तर टोलमाफी

पुणे-बॅंगलोर महामार्गावरून जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाहनांना टोल माफ करण्याचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात आहे का ? असा खोचक सवाल उपस्थित करण्यात आला. त्या प्रश्‍नावर ना.रामराजे यांनी उत्तर देत सत्तांतर झाले तर अवश्‍य टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)