पदाधिकारी विरुद्ध अधिकारी वाद थंडावला

-अनिल काटे

मेणवली – वाई नगरपालिकेत पदाधिकारी विरुद्ध अधिकारी वाद चांगलाच विकोपाला गेल्याचे चित्र सर्व वाईकरांना नुकतेच पहायला मिळाले. विरोधक व सत्ताधारी गटाने एकमेकांच्या सुरात सूर मिसळून उघडलेली अधिकारी हटाव मोहिम सध्या थंडावली असली तरी कोण चांगलं? कोण वाईट? हा प्रश्न सर्व वाईकरांना पडला असून खर खोट्या शंकांचं निवारण करण्यासाठी समोरासमोर समन्वयाची खुली चर्चा होण्याची गरज वाई शहरातील सुज्ञ नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाई नगरपालिकेत दक्षिण काशी वाई “तिर्थक्षेत्रा’चे “जनकल्याण”करणाऱ्या आघाड्या कार्यरत असून नगरपालिका मुख्य अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे तिर्थक्षेत्रातील “जनते’च्या कल्याणकारी योजनेत निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी सर्वजण आघाड्यातील मतभेद विसरून सर्वच पदाधिकारी प्रथमच शहराच्या विकासासाठी एकवटल्याचे पाहून सर्व वाईकर खुश झाले खरे, पण एकाचवेळी दोन्ही बाजूने ऐन थंडीत उघडलेली मोहीम थंडीने काकडल्याची भावना जनतेच्या मनात घर करू लागली आहे.

परंतु, वाई शहर गेले काही वर्षे अनेक समस्यांचा विळख्यात सापडले असून अनधिकृत बांधकामे, वाहतूक, समस्या व्यापारी गाळ्यांचे लिलाव, यात्रा निवासाचे ड्रेनेज, पार्किंग समस्या, मुख्य रस्त्यावर वर्षानुवर्ष उभी असलेली बेवारस वाहने, सार्वजनिक शौचालय दुरवस्था, बाजार पेठेतील व्यापारी वर्गाचे दुकानासमोरील अतिक्रमण या सारख्या अनेक बाबींनी सर्वसामान्य वाईकर पुरते हैराण झाल्याने या सर्व बाबींचीही संबंधितांनी दखल घ्यावी, असे सामान्य जनतेतून बोलले जात आहे.

यापूर्वीही बिलावर सही करण्याच्या वादातून नगराध्यक्ष विरुद्ध पदाधिकारी अशी वाईकरांनी प्रत्यक्ष अनुभवलेली दंगल नंतर काहीदिवसात अलबेल झाल्याची पाहिल्यामुळे आता सुरू झालेली अधिकारी विरुद्ध पदाधिकारी यांच्यामधील दंगल नक्की कशासाठी? याचे कोडे अद्यापतरी जनतेला उलगडलेले नाही.

तिर्थक्षेत्राच्या जनकल्याणासाठी सुरू झालेल्या जंगी दंगलीत “कोण बरोबर? कोण चूक?’याचे उत्तर वाईकर जनता शोधत असून शहराच्या विकासासाठीच नेमलेले व निवडलेले एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिल्याने जनतेच्या मनात अनेक प्रश्नांची चलबिचल सुरू होवून उलटसुलट चर्चेमुळे वाई शहरातील नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

सुरू असलेल्या दंगलीतील खरी ग्यानबाची मेक अजूनतरी नागरिकांना समजली नसली तरी अधिकारी आणि पदाधिकारी सर्वसामान्य वाईकरांचे कल्याणकारी हित जोपासण्यासाठीच हक्काची लढाई खेळत असल्याची धारणा तमाम वाई शहरवासियांची झाली असून अनेकवर्ष अडचणी व समस्याच्या गर्तेत सापडलेल्या वाई शहरासह तिर्थक्षेत्राचे जनकल्याण व्हावे हीच भावना वाईकर जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)