पोलिसांनी नेमके करायचे तरी काय ?

संग्रहित छायाचित्र....

वाळू, दारू पकडणे कोणाचे काम; महसूल विभाग काय करतोय?


-प्रशांत जाधव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा – वाळू म्हणजे नदीपात्रातील काळे सोने,या सोन्याला जसा भाव वाढला,तशी त्यामागील अर्थव्यवस्थाही वेगळ्यावेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पध्दतीने चालु लागली. कुठे अधिकृतपणे तर कुठे अनधिकृतपणे वाळुची चोरी सुरू झाली. यात वाळू व्यवसायीक अन्‌ महसुलाच्या झारीतील काही शुक्राचार्यांनी आपली झोळी भरून घेतली. पण काही देणे नसतानाही पोलिस प्रशासनाची मात्र कोंडी होताना दिसत आहे. वाळू पकडणे हे पोलिसांचे कामच नाही.

तरीही बिचाऱ्या पोलिसांना कारवाईचा अन्‌ टीकेच्या भानगडींचा सामना करावा करावा लागत आहे. पोलिसांना कोणतेही कारवाईचे आदेश नसतानाही त्यांनी कारवाई करावी असा शिरस्ता असेल,तर महसुल विभागाने नेमके कोणते काम करायचे,असा सवाल निर्माण झाला आहे.

जिल्ह्याला कोयना- कृष्णा,येरळा, माणगंगा,उरमोडी,कुडाळी,वेण्णा अशा विविध नद्यांचे पात्र लाभले आहे. याच निसर्गसौंदर्यामुळे भविष्यात गावा-गावात वाळू चोरांची टोळधाड निर्माण होईल असे गेल्या वीस वर्षात कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. याच वाळुने कऱ्हाड तालुक्‍यतील नदीपात्रात रक्ताचा थर तरंगताना अनेकांनी पाहिला आहे.

माणगंगेच्या पात्रात जीव गेलेले नाकाडे आजही महसुलच्या कारभाऱ्यांना आपला जीव कुणामुळे गेला हे सांगण्यासाठी आर्जव करत आहेत. पण ऐकणार कोण? खटाव तालुक्‍यातील आंबवडे गावातील ते दोन चिमुकले वाळुचे कण पाण्यात जावेत तसे वाहुन गेले. त्यावेळी काही संघटनांनी आंदोलन केल्याने महसुलच्या कारभाऱ्यांनी दिखाउ कारवाई केली. असा हा वाळू चोरीचा प्रताप आहे. महसुलने काही अपवाद वगळता कोणती ठोस कारवाई केली,याबद्दल जरा साशंकताच आहे.

… अशी होते कारवाई

जर कोणत्या नहसुली सजात वाळु चोरी होत असेल तर, तलाठी,सर्कल,तहसीलदार यांनी त्या चोरी करणाऱ्या वाहनावर व व्यक्तीवर कारवाई करावी. त्यानंतर महसुलच्या कर्मचाऱ्यांनी संबंधीतांच्या विरोधात नजिकच्या पोलिस ठाण्यात चोरीची अथवा महसुल कायद्यानुसार शक्‍य त्या कलमानुसार तक्रार द्यावी. मग त्यावर पोलिस कारवाई करतील.

-पथकांची भरारी नक्की कुणीकडे?

वाळू चोरीला आळा बसावा यासाठी महसुलच्या वरिष्ठांनी तालुका व उपविभाग पातळीवर भरारी पथक नेमण्याचे आदेश दिले. यापुर्वी महसुलच्या कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले पाहता त्या भरारी पथकात स्थानिक ठाण्यातील पोलिसांचा समावेश करण्याचे सुचित केले आहे. मात्र बहुतेक ठिकाणी महसुलचे स्थानिक कारभारी पोलिसांना काही अंगाशी लागुन घेत नसल्याचे सत्य आहे. त्यातच काही अंशी भरारी पथके सध्या गारठली आहेत. त्यामुळे भरारी पथकाची भरारी नेमकी कुणीकडे सुरू आहे,असा सवाल विचारला जात आहे.

-नाकापेक्षा मोती जड

वाळू चोरांच्यावर कारवाई करुन जरब बसवण्याचे काम महसूल यंत्रणेचे आहे. मात्र त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने व वाळू चोरीतून मिळालेल्या अमाप पैशामुळे वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्यासाठीच पोलिसांना वाळू चोरीकडे लक्ष द्यावे लागत आहे. मात्र, स्वतःचा अकार्यक्षमपणा झाकण्यासाठी माणदेशातील महसूल विभागाच्या एका कारभाऱ्याने पोलिसांची वाळूवरील कारवाई म्हणजे आमच्या कार्यक्षेत्रात नाक खुपसण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड झाल्याची भावना एका वरिष्ठ पोलिसाने व्यक्‍त केली.

गत आठवड्यात सातारा येथील गुन्हे शाखेने म्हसवड येथे माण गंगेच्या नदीपात्रातील काळे सोने लुटून गब्बर झालेल्या वाळूमाफीयांच्या मुसक्‍या आवळल्या. ती कारवाई जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांच्या आदेशाने पो.नि.विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या स.पो.नि. विकास जाधव यांच्या पथकाने केली होती. यावेळी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसह चोरलेली वाळू,मोबाईल असा 23 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता.

त्यानंतर दि.24 रोजी मायणी पोलिस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी बोलेरो पिकअप, टाटा टेंपोसह चोरलेली वाळू असा तेवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. दि.26 रोजी कोरेगावच्या उपविभागाच्या पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी खटाव तालुक्‍यातील भुरकवडी गावातील येरळा पात्रात सुमारे 66 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस मोठ्याप्रमाणात वाळुचोरांना जरब बसवण्यासाठी प्रयत्न करत असतील,तर ज्यांची वाळू चोरांवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे,तो महसुल विभाग नेमका कोणत्या कामात व्यस्त आहे,याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली तर पोलिसांचे निम्मे काम हलके होईल. कायदा सुव्यवस्था राखणे, अतिमहत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देणे, रोज घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करणे यासह दैनंदीन धावपळ असलेल्या पोलिसांना वाळुचोर पकडण्याचा अतिरीक्त ताण नेमका कशासाठी दिला जात आहे आणि महसुलच्या अधिकारातील या विषयात कारवाई करताना महसुलला कशाची अडचण आहे.

खरच महसुलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना,कर्मचाऱ्यांना या गोष्टी माहीत नाहीत की त्यांनी ते पहायचेच नाही,अशी प्रतिज्ञा केली आहे? खरे तर महसुलच्या अधिकाऱ्यांनी वाळुचोर पकडावेत अन पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार द्यावी, असा नियम आहे. मात्र सध्या सारे उलटेच घडत आहे. पोलिसच कारवाई करतात,मात्र त्यांना मदत व त्यानंतर महसुलने द्यायची तक्रार देण्यासही काही अधिकारी, कर्मचारी धजावत नाहीत. त्यामुळे या न धजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर वाळुचोरांचा की वाळुचोरीतून मिळालेल्या काही हिश्‍शाचा नेमका कुणाचा प्रभाव आहे, याचा शोध वरिष्ठांनी घ्यायला हवा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)