जगायचं कशासाठी हेच अनेकांना माहिती नाही : नाना पाटेकर

घारेवाडी : युवा हृदय संमेलनात युवकांना मार्गदर्शन करताना सिनेअभिनेते नाना पाटेकर. समोर उपस्थित युवक वर्ग.

घारेवाडीत बलशाली युवा हृदय संमेलन

कराड – जगायचं कशासाठी हे अनेकांना माहिती नाही. मला खुप काय करायचाय. मात्र काय करायचाय हेच तरुणाईला माहिती नाही. अजंठा आणि वेरुळच्या तुटलेल्या मुर्तीत सौदर्य शोधण्यापेक्षा बाबा आमटे यांनी होते नव्हते त्या सर्वांचा त्याग करुन आनंदवनच्या माध्यमातून समाजसेवा सुरु केली. तरुणांनी जीवन का जगावं हे हेमलकसाला जावून आमटे कुटुंबियांकडून शिकले पाहिजे. समाजाला आज त्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घारेवाडी, ता. कराड येथील बलशाली युवा हृदय संमेलनात रविवारी सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी राज्यासह परराज्यातून आलेल्या युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजीत देशमुख, कराड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, कराड मर्चंट समुहाचे सत्यनारायण मिणीयार यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, संचालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नाना पाटेकर म्हणाले, प्रत्येक वेगवेगळ्या समाजात पुढारीमंडळी तुमच्या डोक्‍यात राख घालत आहेत. तुमच्या मेंदुवर ते अतिक्रमण करताहेत आणि ते तुम्ही करु देताय हे चुकीचे आहे. ज्यांचे राजकीय अस्तीत्व संपलेले आहे. ती माणसे उगाचच उपद्रव्य मुल्य म्हणून काही तरी बोलत असतात. त्यांना उगाच प्रसिध्दी देवू नका. माध्यमांनी खूप छान घडतय याचेही आज दाखवण्याची गरज आहे. युवकांनी पुढारी मंडळींना इतकी वर्षे खांद्यावर वागवले, त्यांना आता खाली उतरवले पाहिजे. कोणीही येतो, काहीही बोलतो, त्यातून जाळपोळ सुरु होते. हे बंद झाले पाहिजे. आपल्या गरजा किती आहेत त्या ठरवा. त्यानंतर आपले आयुष्य फार सोपे होईल, असेही पाटेकर म्हणाले.

अनासपुरे म्हणाले, जीवन जगताना चांगले जगा. आपण श्रीमंत होतो असा भ्रम असतो. अनेकांकडे पैसे आहेत .मात्र सुख-समाधान नाही. देशप्रेम, राष्ट्रप्रेम घोषणेत असून उपयोगाचे नाही, ते आपल्या कृतीत असले पाहिजे. कुठल्याही रस्त्याला महापुरुषांची नावे देणे खुप सोपे आहे. मात्र त्यांच्या रस्त्यावर आपण चालतो का? हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. व्हेलेंटाईन डे हा आपला नाही. आपल्या भारतीय संस्कृतीतील डे साजरे करा, महापुरुषांच्या जयंत्या स्वच्छता, वृक्षारोपणाने साजरे करा. जो हुंडा घेतो त्याचा स्वकर्तृत्वावर विश्‍वास नाही असे त्यातून सिध्द होईल. आपल्या घरातील महिला कुटुंबासाठी दिवसभर राबते. त्यामुळे त्यांचा अभिमान आणि आदर असला पाहिजे. स्त्री शक्ती ही ओळखून त्यांनाही आपल्याबरोबर कामासाठी घेतले पाहिजे. त्यांचा आदर करण्याची वृत्ती आपल्यात आली पाहिजे.

जो माणूस आपल्याला भडकवतो. त्यापाठीमागे काय हेतु आहे हे तपासण्याची गरज आहे. सकारात्मक कामासाठी तुम्ही जरुर पुढे जा. मात्र त्यातून समाजविघातक आग निर्माण होणार असेल तर ते थांबवण्याची गरज आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे हे मनात असले पाहिजे. पाण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला आहे. जेथे पाऊस पडतो, तेथे पाऊसच पडला नाही. त्यामुळे यावर्षी भीषण टंचाईची स्थिती आहे. त्यातून निसर्ग बोलू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता तरी आपण सावध होणार आहोत का हा प्रश्‍न आहे. तरुणांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवणे हे राष्ट्रीय काम असून ते इंद्रजीत देशमुख यांच्या माध्यमातून शिवम प्रतिष्ठान करत आहे, हे फार मोठे काम आहे.

सोशल मिडीयाने आमच्या क्षेत्रातील खूप माणसे मारली. एकही गोष्ट न लिहीता नाना पाटेकरांच्या नावाने सोशल मिडीयावर खूप मेसेज येतात. जो माणुस सातत्याने चांगले काम करतो, त्याची बदनामीची मोहिम सुरु झाली की तो माणुस तसाच असेल असे मत तयार करायचे का? सोशल मिडीयावरील माहितीवर किती विश्‍वास ठेवायचा याचा समाजाने विचार करावा. आज समाजातील चांगल्या माणसांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे. जी माणसं आपल्याला वाईटाकडे घेवून जातात ती आपली नाहीत. जेवढे जमेल तेवढे सकारात्मक काम करा, असेही आवाहन अनासपुरे यांनी यावेळी केले.

इंद्रजीत देशमुख म्हणाले, सत्ता, संपत्ती, प्रेरणा, मान, सन्मान या जगण्याच्या प्रेरणा आहेत. मात्र दुसऱ्याच्या आयुष्य समृध्द करता करता आपले आयुष्य समृध्द करणे ही मोठी प्रेरणा आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाशी समरस होवून त्यांच्याशी आपणाला काय करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. जे घडवणारे आहेत, आधार देणारे आहेत, हे हात तयार करण्याचे काम आम्ही करत आहोत. स्वतः जगून इतरांना जगवण्याची प्रेरणा घेवून आम्ही शिवमच्या माध्यमातून देत आहोत. चित्रपट अभिनेते समृध्दी जाधव यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)