लाखो रुपये खर्च होवूनही बावधनचा पाझर तलाव कोरडा

माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या भागातच जलसंधारणात सावळा गोंधळ

पुनर्वसनाचा प्रश्‍न अद्याप प्रलंबित

नागेवाडी धरणाच्या लाभार्थींचा पुनर्वसनाचा प्रश्न आजही प्रलंबितच आहे. राजकीयदृष्ट्‌या अतिसंवेदनशील असणाऱ्या बावधन परिसरातील वागजाईवाडी पाझर तलावाच्या दुरुस्तीकडे डोळेझाक न करता गांभीर्याने बावधन गावातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तलावाला लागलेली गळती काढावी व हजारो हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी पाझर तलाव परिसरातील शेतकरी करीत आहेत. लवकरात-लवकर तलावाची दुरुस्ती करून बारमाही तलावातील टिकेल, असे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

वाई – बावधन परिसरातील वागजाईवाडीच्या पाझर तलावाला अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. बावधनचा काही भाग लाखो रुपये पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचा खर्च होवून सुध्दा पाण्यापासून वंचित राहिला आहे. याला सर्वस्वी पाणी पुरवठा विभागाचा भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक वर्षांपासून या पाझर तलावावर खर्च झालेला निधी पाण्यात गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील सर्व पाझर तलावांची दुरुस्तीची कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग करीत असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांच्या गावातच पाझर तलावाची अवस्था अशी असेल तर तालुक्‍यातील तलावांची अवस्था न विचारलेली बरी!

बावधन परिसरातील पाझरतलाव व नागेवाडी धरण हे कै. मदन (आप्पा) पिसाळ यांच्या अथक प्रयत्नातून बांधण्यात आले आहे. बावधनसह परिसरातील बारा वाड्यांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागेवाडी धरण व वागजाईवाडीच्या पाझर तलावावर अवलंबून आहे.

मदन पिसाळ यांच्यानंतर या भागात अभ्यासू नेतृत्वच नसल्याचा मोठा फटका या सार्वजनिक कामांवर बसला. या पाझर तलावावर पंचायत समितीचा पाणी पुरवठा विभाग अनेक वर्षांपासून लाखो रुपये दुरुस्तीच्या नावाखाली खर्च करत आहे. परंतु, अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने खर्च झालेला निधी फक्त कागदोपत्रीच दाखवण्यात आल्याचे दिसत आहे. संबंधित ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

नागेवाडी धरणातील पाणी मासेमारीसाठी वापरण्यात येत असे. सध्या मात्र तलावाची दुरुस्ती व्यवस्थित न झाल्याने चिमणीला पिण्यासाठी पाणी शिल्लक राहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून बावधनचा काही भाग व चार ते पाच वाड्या शेतीच्या पाण्यापासून वंचित राहिल्या आहेत. आ. मकरंद पाटील यांनी निधी उभा केल्याने कालव्यांची कामे पूर्ण झाली व बावधनसह बारा वाड्यांच्या परिसरात पाणी खळ-खळायला लागले आहे. त्यामुळे जवळ-पास पाच हजार हेक्‍टर जमीन ओलिताखाली आली आहे. परिसराचा कायापालट होण्यासाठी या पाझर तलावाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)