फलटणमध्ये वाढला रोडरोमियोंचा त्रास

-रोडरोमियोंच्या त्रासाने मुलींचा कॉलेजचा रस्ता बिकट
-बंदोबस्त करण्याची मागणी
-कॉलेज, बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची गरज

-अजय माळवे

फलटण – शहरातील बस स्थानकात महिला व मुलींकडे पाहून अश्‍लिल शेरेबाजी व शिवीगाळीचा प्रकार होत असून दिवसेंदिवस या सडक सख्याहरींचा त्रास वाढतच चालला आहे. महिला व विशेष करुन विद्यार्थीनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निर्भया पथकाने सडक सख्याहरींचा बंदोबस्त करावा व बसस्थानकात सर्वत्र सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, अशीही मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण बस स्थानकात गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या सुमारास विशेष करुन बारामतीला जाणाऱ्या गाड्या लागतात. त्या परिसरात सडक सख्याहरींचा त्रास वाढला आहे. या सडक सख्याहरींना टूकार कॉलेज कुमारांचीही साथ आहे. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे पाहून अश्‍लिल शेरेबाजी करणे, टोमणे मारणे, फोन नंबर मागणे तसेच एकमेकांना अश्‍लिल हावभाव करीत शिवीगाळ करणे हा प्रकार सातत्याने होत आहे. तसेच कॉलेजला दांडी मारून थांबलेल्या टूकार विद्यार्थ्यांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

शिक्षणाच्या निमित्ताने फलटण शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थीनींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागातील अनेक मुलींना सडक सख्याहरींच्या त्रासास सामोरे जावे लागत आहे. त्रास सहन करणे अवघड होत आहे व घरी सांगावे तर शिक्षण बंद होईल, अशी कुचंबणा होत आहे.

पालकांनी वेळीच सावध होणे आवश्‍यक

बस स्थानक व अण्य परिसरात सडकखख्याहरींना व रोड रोमियोंना साथ देणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग आहे. शाळा, कॉलेज बुडवून टूकारगीरी करण्यात हे विद्यार्थी धन्यता मानतात. त्यामुळे पालकांनी आपली मुले नियमितपणे शाळेत, कॉलेजमध्ये उपस्थित असतात का याची माहिती स्वतः घेणे आवश्‍यक आहे. जर मुलांवर गुन्हा दाखल झाला तर त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात येईलच, परंतु पालकांनाही हतबल होण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होणे आवश्‍यक आहे.

बस स्थानकाचे प्रवेशद्वारच या बाजूने असल्याने व रस्त्याच्या पलीकडील बाजूस मुलींची शाळा असल्याने हा परिसर रोडरोमियोंनी नेहमीच गजबजलेला असतो. अशा प्रकारची टोळकी बस स्थानकच नव्हे तर शहरभरात ज्या ज्या ठिकाणी शैक्षणिक संस्था आहेत तीथे कायमपणे घुटमळत असल्याचे दिसून येतात. त्यामुळे फलटण बस स्थानक परिसरात सीसीटिव्ही क्‍यामेरे बसविण्याची गरज आहे.

निर्भया पथकाची निर्मिती करण्यात आली असली व शाळाशाळांमध्ये मुलींना जाचापासून मुक्ततेसाठी काय करावे याचे मार्गदर्शन करण्यात येत असले तरी विद्यार्थीनी व महिलांमध्ये खर्या अर्थाने भिती जाऊन आत्मविश्‍वास जागृत झाला आहे का? हे पाहणेही महत्वाचे आहे.

छोट्या गोष्टींना पाठबळ मिळाले की आत्मविश्‍वास व धैर्य वाढते व त्यातून गुंड बनण्याकडे वाटचाल सुरु होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने बस स्थानकासह शाळा, कॉलेजेस परिसरात अचानकपणे भेटी द्याव्यात व रोडरोमियोंवर कडक कारवाईचे धोरण अवलंबवावे अशी मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)