प्रांत कार्यालयातील भरारी पथक गेले कुणीकडे ?

वडूज : 1) येरळा नदीपात्रात दिवसाढवळ्या मजुरांच्या सहायाने वाळू उपसा केला जात आहे (2) वाळू उपसा करून मोठं मोठे वाळू साठे केले आहेत.

खटाव तालुक्‍यात दिवसा खुलेआम अवैध वाळू उपसा : नागरिकांमध्ये संताप


-नितीन राऊत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडूज – सध्या खटाव तालुक्‍यात बेसुमार बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. दिवसाढवळ्या नदीच्या पात्रात जेसीबी मशीन व मजुरांच्याकडून खुलेआम वाळू उपसा होत आहे. परंतु, वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी स्थापन केलेले भरारी पथक नेमकं कुणीकडे गेलं असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेत उपस्थित होतोय. वरिष्ठांकडून तरी दखल घेतली जावी, अशी मागणी होत आहे.

कारवाईत सातत्य राखण्याची गरज

माण-वाळू तस्करीवर पायबंद घालण्यासाठी गेल्या पाच महिन्यापूर्वी कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी एक भरारी पथक तयार करून मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. त्यामुळे वाळु तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले होते. या पथकाने कुणाचाही मुलाहिजा न ठेवता दोन तालुक्‍यात जवळपास वाहनांवर कारवाई केली होती. मात्र, कारवाई एवढ्यावरच न थांबवता खटाव तालुक्‍यात ही आता पथकाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.

आज रविवारी अधिकारी सुट्टीवर असल्याने नदीच्या पात्रात दिवसा बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे पाहायला मिळाले. तालुक्‍यात येरळा नदीपात्रात वाळू माफियांनी थेमान घातले असून काही ठिकाणी वाळूचे मोठे मोठे साठे केले असल्याचे दिसून आले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत वाळू माफियांचे मात्र सोने झाले अशी चर्चा आज दिवसभर शहरात सुरू होती.

अंबवडे, ता. खटाव येथील येरळा नदी पात्रात केलेल्या बेसुमार वाळू उपसामुळे तीन बालकांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर तरी प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा होती. मात्र, आज या नदीपात्रात मोठे खड्डे पडले असल्याचे दिसून आले. यामुळे प्रशासन अजून किती जणांचे बळी जाण्याचे वाट बघत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

तीन महिन्यांपूर्वी भरारी पथकाने मायणी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी व वाहनांवर कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर पथकाने एकही मोठी कारवाई केलेली नाही. वाळू उपसा मात्र, होतच आहे. पथकाकडून कारवाई होत नसल्याने वाळू माफियांचे मात्र चांगलेच फावले आहे.

खटाव तालुक्‍यात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या ठिकाणी व वाहनांवर गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. यामुळे अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच दिसतात की काय? स्थानिक महसुल विभागाला व प्रशासनाला दिसत नाही का असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)