सत्तेच्या खुर्चीचे ढग जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गोठले

-अनिल काटे

मेणवली – तीर्थक्षेत्राच्या वाई नगरपालिकेतील आघाडीच्या बहुतांशी कारभाऱ्यांमध्ये गेली काही दिवसांपासून वर्चस्वाच्या श्रेय वादासह विकास निधीच्या विविध मुद्यावरून अंतर्गत कुरबुरीच्या घटना वाढू लागल्याने निम्याअधिक कारभारी मंडळीनी नाराजीचे टोक गाटले होते. तीर्थक्षेत्रामधील आघाड्यात बिघाडीचे ढग जमू लागले असतानाच ‘जो रजिष्टर त्यालाच मिळणार पदाचा शिष्टाचार’ असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने सर्वच आघाडीच्या शिलेदारांचे सत्तेच्या खुर्चीचे ढग थंडीने गोठल्याची चर्चा वाई शहरात रंगली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाईच्या तीर्थक्षेत्रातील सत्तेच्या बाहेरून सत्तेची सूत्रे फिरविणाऱ्या काही ठराविक प्रमुख नेतेमंडळीच्या राजकीय गटबाजीच्या खेळीचा फटका वाई नगरपालिकेत सत्तेच्या खुर्चीतील बिनी खेळाडूंना बसल्याचे संकेत खात्रीशीर सूत्रांकडून सर्व वाईकरांना ऐकायला मिळत आहेत. दक्षिणकाशी क्षेत्राच्या आघाडीतील पेटलेला बिघाडीचा सुतळी ऍटमबॉम्ब फुटणार का विझणार? असा प्रश्न शहरातील मतदारांना पडला आहे.

वाईच्या नगरपालिकेत भाजप, कॉंग्रेस व अन्य पक्षांची पुरस्कृत महाविकास आघाडी तर राष्ट्रवादी पुरस्कृत तिर्थक्षेत्र अशा आघाड्या कार्यरत असून वाई नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी थेट निवडीतून एका मताने नगराध्यक्षांच्या खुर्चीवर वाई विकास महाआघाडी पुरस्कृत भाजपच्या उमेदवाराला बसविले. त्याच मतदारांनी वाईच्या नगरसेवकांच्या बहुमताचा कौल मात्र आमदार गटाच्या पदरात टाकल्याने आमदार गटाला मिळालेल्या बहुमताच्या जोरावर उपनगराध्यक्ष पदाची माळ आपोआपच आमदार गटाच्या आघाडीच्या गळ्यात पडली.

सत्तेची मुख्य खुर्ची एक मताने निसटली तरी वाई नगर पालिकेतील प्रमुख सगळी सत्तास्थाने बहुमताने आमदार आघाडीच्याच ताब्यात राहिल्यामुळे सद्यस्थितीत नगरपालिकेचा सगळा कारभार आमदारांचे प्रमुख कारभारी हाकत असल्याचे दिसून येत आहे.

लाच लुचपत विभागाच्या नगराध्यक्षांवरील कारवाईनंतर काही काळापुरते निर्माण झालेले अति टोकाचे तणावाचे वातावरण आता पूर्णतः निवळले गेल्याने सध्या तरी दोन्ही आघाडीतील मान्यवर मुख्य शिलेदारांमध्ये सर्वकाही अलबेल सुरू असल्याचे चित्र वाईकरांबरोबर तटस्थ भूमिकेतील शिलेदारांना अनुभवायला मिळाल्याचे बोलले जात आहे. वाई तीर्थक्षेत्रातील अनुभवी खिलाडी विकास कामासह आर्थिक निधी, विविध कामाचे ठेके व टेंडरसारख्या अन्य प्रक्रियेमध्ये नव्या दमाच्या निम्याअधिक खेळाडूंना सहजपणे अलगत बगल देवून बाजी मारत नेत असल्याने नवे खिलाडी आतून पूर्णतः घायाळ होत चालल्याने खाजगीत सवतासुभा मांडण्याची भाषा बोलू लागले होते हे सत्यही नाकारून चालणार नाही.

सत्तेत सहभागी असूनही मनाप्रमाणे सत्तेत वाटा मिळत नसल्याने अनेकांच्यात नाराजी वाढू लागली आहे याची दखल कधी तरी आघाडीचे नायक घेतील, या एका आशेने नाराज गटाचे शिलेदार मूग गिळून गप्प बसले असले तरी अजून किती काळ वाट बघत बसायचे? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच उपनगराध्यक्षांच्या खुर्चीसह विविध समित्यांच्या खुर्चीच्या निवडी जवळपास येवून ठेपल्या असताना अनेकांनी खुर्चीसाठी दोन महिने आधी गुडघ्याला बाशिंगे बांधली होती. मग आघाडी रजिष्टर नसल्याचे कुणालाच माहीत नाही का? की माहीत असूनही दक्षिणकाशी वाईत सत्तेतील राजकीय कुरघोडीने जननायकांच्या महिन्या आधीच्या सूचनेला कोणी कोलदंडा दिला हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

तिर्थक्षेत्राच्या प्रवाहात बिघाड झालेल्या आघाडीतील तिर्थक्षेत्राचे तीर्थ भविष्यात कोणाकोणच्या ओंजळीत पडणार? का वळचणीला सांडणार? का पवित्र क्षेत्राचे तीर्थ परत कोणत्या आघाडीच्या पदरात सांडणार याची उत्सुकता वाईतील शहरातील नागरिकांना लागून राहिली आहे तरी सध्याच्या घडामोडी पहाता शहराचा विकास काही काळ गोठणार हे निश्‍चित.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)