पुसेगाव यात्रा होणार प्लॅस्टिकमुक्त

राज्यातील पहिला उपक्रम : यात्रेकरुंना 25000 कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचे आयोजन

पुसेगाव – श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानास चालना देण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उद्यापासून सुरु होणारी यात्रा ही राज्यातील पहिली प्लॅस्टिकमुक्त यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक वापराबाबत जनजागृतीबरोबरच ट्रस्टतर्फे यात्राकाळात यात्रेकरुंना 25000 छापील कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहेत. या शिवाय यात्रेत विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमही हाती घेण्यात आले असल्याचे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सामाजिक वनीकरण, जलसंधारण, सांस्कृतिक, आरोग्य व शैक्षणिक यासारखे सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या सेवागिरी ट्रस्टने यात्रेच्या माध्यमातूनही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या संकल्पनेतून श्री सेवागिरी महाराजांची यात्रा ही राज्यातील पहिली प्लॅस्टिकमुक्त यात्रा भरविली जाणार असून लाखोच्या संख्येने यात्रेला येणारे यात्रेकरु व व्यावसायिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन विश्‍वस्त योगेश देशमुख, प्रताप जाधव, मोहनराव जाधव, रणधीर जाधव व सुरेशशेठ जाधव यांनी केले आहे.

स्वच्छ भारत अभियानात ग्रामीण विभागात नावलौकिक मिळवलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्लॅस्टिकमुक्त जिल्हा या उपक्रमास यामुळे हातभार लागणार आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या व अन्य प्लॅस्टिक कचरा गटारे, ओढे, नाले, नद्या, तलाव व गावांच्या परिसरात साचून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्लॅस्टिकमुक्त यात्रेचा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. सध्या मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेतच. परंतु सेवागिरी देवस्थान ट्रस्ट येथील व्यापारी, ग्रामस्थ व पुसेगाव पोलिसांच्या तर्फे यात्रेमध्ये व गावामध्ये कायमस्वरुपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून या उपक्रमाचा 50 टक्के खर्च सेवागिरी देवस्थान ट्रस्ट उचलणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

एकेकाळी बैलबाजारातील शेतकऱ्यांना भाजी व भाकरी बनवून देणाऱ्या विविध गावातील अन्नपूर्णा महिलांचा चांगला चरितार्थ चालत असे. परंतु सध्या भाजी-भाकर तयार करण्याचे काम मिळत नसल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात येताच ट्रस्टचे विश्‍वस्त मोहनराव जाधव यांनी बैलबाजारात शेतकऱ्यांना केवळ पाच रुपयांत भोजन देण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार ट्रस्टतर्फे या महिलांना बेसनपीट व ज्वारीचे पीट मोफत दिले जाते.

या महिला शेतकऱ्यांना केवळ पाच रुपयांत शेतकऱ्यांना झुणका भाकर देतात. प्रती शेतकरी मिळणारी सर्व रक्कम या महिलांना मिळत असल्याने गोरगरीब व्यक्ती व शेतकऱ्यांबद्दल कळवळा असणाऱ्या ट्रस्टच्या या उपक्रमाद्वारे या निराधार महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांनाही केवळ पाच रुपयांत भोजनाची सोय झाली
आहे. यात्रा काळात येणाऱ्या यात्रेकरुंच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी ट्रस्टतर्फे आरोग्य विभागाला सर्व आजारांवरील औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आली असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)