कराडात विशेष सभेवर भाजपाचा बहिष्कार

कराड – येथील नगरपालिकेच्या वतीने वर्षाच्या समारोपदिनी आयोजित केलेल्या विशेष सभेवर भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचेही सभेच्या ठिकाणी उशिरा आगमन झाल्यामुळे पालिका वर्तुळात एकच चर्चा सुरू होती. दरम्यान दोनही विषय एकमताने मंजूर करण्यात आले. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान मंगळवार दि. 1 जानेवारी रोजी पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी होणार असून यादिवशी बहिष्काराचे कारण सांगू असे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी सांगितले.

स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत सेव्हन स्टार मानांकनानुसार घोषित करण्यासाठी मागविण्यात आलेल्या हरकती व सुचनांवर अंतिम निर्णय घेण्याकरिता या विषेस सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू होण्यापूर्वी भाजपाचे सर्व नगरसेवक पालिका कार्यालयातून बाहेर पडले. सभेच्या ठिकाणी जनशक्‍ती व लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांचे आगमन झाल्यानंतर भाजपा नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्षाही आल्या नसल्याने मुख्याधिकारी डांगे यांना विचारपूस केली. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व मुख्याधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर काही वेळातच नगराध्यक्षांचे आगमन झाले.

आज विषय समित्यांच्या निवडी

कराड नगरपालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्य व सभापतीपदाचा कार्यकाल संपल्याने नवीन विषय समित्यांच्या निवडी मंगळवार दि. 1 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. या विशेष सभेत स्थायी समिती, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण समिती, आरोग्य समिती, पाणी पुरवठा नियोजन व विकास, महिला व बालकल्याण समित्यांसाठी सदस्यांचे सभापती पदाच्या निवडी होणार आहेत. नगरपालिकेमध्ये जनशक्‍ती आघाडीचे बहुमत असल्याने आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दोनवेळा सभापतीपदे भुषविण्याची संधी मिळणार आहे. तसेच लोकशाही आघाडी व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यामध्ये संधी मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर अवघ्या पंधरा मिनीटांच्या कालावधीत दोन्ही विषयांना मंजूरी देत सभा आटोपती घेण्यात आली. सभा संपन्यापूर्वीच भाजपाच्या नगरसेवकांचे पुन्हा पालिकेत आगमन झाले. मात्र बहिष्काराबाबत बोलण्यास त्यांनी टाळाटाळ केली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनीही याबाबत आपणास काहीच माहित नसल्याचे सांगितले.

दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सेव्हन स्टार मानांकनामध्ये कचरा गोळा करणे, कचरा वर्गीकरण करण्याचे प्रमाण, वाणिज्य क्षेत्रात लिटर बिन्स, सार्वजनिक ठिकाणची सफाई, उपभोगता शुल्क, नदी-नाल्यांची स्वच्छता व प्लास्टिक बंदीबाबत केलेल्या कार्यवाहीचा समावेश आहे. पालिकेने याबाबत पुर्तता केली असून सेव्हन स्टार मानांकन प्रमाणपत्राबाबत नागरिकांच्या हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. यावर एकही हरकत न आल्याने त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.

तसेच ओडीएफ प्लस प्लस व स्टार रेटिंग करिता आवश्‍यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. कराड शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या शौचालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, साबण, आरसा, सिमेंटच्या कुंड्या, टिश्‍यू पेपर पेटी, कचरा वेचक महिलांसाठी ओळखपत्र, महिलांच्या शौचालयांच्या ठिकाणी व्हेडिंग मशिन, लोखंडी रॅक, लावण्यात येणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद पालिकेने केली असून त्याच्या प्रस्तावास मंजूरी देण्याबाबतच्या विषयाचे वाचन नगरसेविका स्मिता हुलवान यांनी केले. माजी नगराध्यक्षा शारदा जाधव यांनी त्यास अनुमोदन दिले.

दरम्यान सभेच्या समारोपानंतरही भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बहिष्काराबाबत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना विचारले असता. त्यांनी आपणास कोणीच काही सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)