महिलांना लुटणाऱ्या टोळीचे पोलिसांना आव्हान

file photo

एकाच दिवशी साडेआठ तोळे लंपास; शहरातील महिलावर्गात भितीचे वातावरण

“त्या’ टोळीच्या नावाखाली

काही काळापुर्वी सातारा शहरासह ग्रामीण भागात अशाच पद्धतीने महिलांना लुटणारी टोळी सक्रिय झाली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पुण्यातील इराणी टोळीचा पदाफाश केला होता. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. मात्र प्रत्येकवेळी लुटणारे इराणीच असतील असे नाही. त्यांच्या नावाखाली भुरट्या चोरांचे फावणार नाही,याचीही दक्षता पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

सातारा – सातारा शहरात व शाहूपुरी उपनगरात महिलांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळक्‍याने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी एकाच दिवशी या चोरट्यांनी शहरातून साडे आठ तोळे वजनाचे सोने लंपास केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचे वाढलेले धाडस सातारा शहर अन्‌ शाहूपुरी पोलिसांना आव्हान देणारे असल्याचे बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा शहरात वेगवेगळ्या पद्धतीने महिलांना लुटण्याच्या दोन घटना घडल्या. मात्र लुटारू एकच असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. पहिली घटना शनिवारी सायंकाळी साडे आठच्या सुमारास गोडोली परिसरातील पालवी चौकात घडली. चोरट्यांनी घरी चालत निघालेल्या भारती शिवाजी गुजर (रा.गोळीबार मैदान,सातारा) यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाचे गंठन व एक तोळ्याचे लॉकेट हिसका मारून पळवले. ही घटना दोन अनोळखी चोरट्यांनी केल्याचे गुजर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीचा तपास पोलिस उपनिरीक्षक नानासो कदम करत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत रोहिणी राजीव देशपांडे (रा. गडकरआळी,सातारा) या शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या घराच्या परिसरात चालत निघाल्या होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडे तीन तोळे वजनाचे गंठन हिसका मारून पळवल्याचे त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक फरास करत आहेत. दोन्ही घटनांची माहिती मिळताच सातारा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या.

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांत एकाच पद्धतीने महिलांना लुटल्याच्या घटना घडल्याने लुटारूंची टोळी सक्रिय झाल्याची भिती निर्माण झाली आहे. घटना वेगळ्या असल्या तरी लुटीचा प्रकार सारखाच असल्याचा अंदाज काही पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे महिलांना लुटणाऱ्या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्यातून होवू लागली आहे. लोकभावनेचा विचार करुन जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर व शाहूपुरी पोलीस या सोन साखळी चोरट्यांचा मागोवा लवकरच लावतील अशी आशा व्यक्‍त होत आहे.

… आता तरी बिट मार्शल सुरू होणार का?

शहरात कोणाताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी बिट मार्शलचा अभिनव प्रयोग साताऱ्यात सुरू करण्यात आला होता. काही काळ सुरू असलेल्या या प्रयोगाने बहुतांश भागातील चोऱ्या, किरकोळ चोऱ्या आटोक्‍यात आल्या होत्या. मात्र गेली एक वर्ष झाले, बिट मार्शलचा भोंगा वाजलाच नसल्याने भुरट्या चोरांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे शहरातील दुचाकी चोरी,महिलांना लुटीच्या घटना घडल्यानंतर तरी बिट मार्शल सुरू होणार का? असा सवाल विचारला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)