झेंडा मिरवणुकीने सेवागिरी यात्रेला प्रारंभ

पुसेगाव – श्री सेवागिरी महाराज की जयचा गजर करत काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीने पुसेगावच्या यात्रेचा शुभारंभ झाला. मिरवणुकीनंतर झेंड्याची यात्रास्थळावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध शाळांच्या सहकार्याने सेवागिरी देवस्थान ट्रस्टने विविध सामाजिक प्रश्नांबाबात सामाजिक प्रबोधनाचा स्तुत्य उपक्रम राबविला.

श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त दि. 30 ते दि. 9 जानेवारीपर्यंत यात्रा भरणार आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव, सरपंच हेमा गोरे, उपसरपंच प्रकाश जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, ट्रस्टचे माजी अध्यक्ष जगनशेठ जाधव, शामराव जाधव, शिवाजीराव जाधव, संजय जाधव तसेच विश्वनाथ जाधव, बाळासाहेब जाधव, सुरेश पाटील, सुसेन जाधव, रघुनाथ दळवी, रमेश देवकर, वैभव शिंदे, अरुण जाधव उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रारंभी मंदिराच्या प्रांगणात हनुमानगिरी हायस्कुल, सेवागिरी विद्यालय, इंदिरा गांधी कन्याप्रशाला, शासकिय विद्यानिकेतन, कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच विविध प्राथमिक शाळांचे विद्यार्थी जमले. सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे पाण्याचा काटकसरीने वापर, स्वच्छतेचे महत्व, वृक्षारोपण, बेटी बचाव या सामाजिक प्रश्नाची जागृची करणारे फलक तयार करण्यात आले होते. विविध शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे फलक हातात घेऊन त्याबाबतच्या घोषणा देत समाजजागृतीचा स्तुत्य उपक्रम राबवला. या मिरवणुकीत पुसेगाव व परिसरातील विविध गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

पालखीच्या पाठीमागे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले भाविक पालखीचे दर्शन घेत होते. छत्रपती शिवाजी चौकात विविध शाळांच्या झांज व लेझीम पथकांनी आकर्षक खेळ सादर केले. दुपारी पावणे एक वाजता मिरवणूक यात्रास्थळावरील ट्रस्ट कार्यालयाजवळ आल्यावर तेथे झेंड्याची पारंपारीक पद्धतीने मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सर्व विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. झेंडा प्रतिष्ठापनेने नऊ जानेवारीपर्यंत भरणाऱ्या या यात्रेला प्रारंभ झाला.

सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, यावर्षी यात्रेनिमित्त यात्रास्थळावर विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. अनेक मनोरंजनाची साधनेही उपलब्ध झाली आहेत. परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ व आंध्रप्रदेशातून लाखो भाविकांची उपस्थिती असते.त्यामुळे एसटी महामंडळातर्फे यात्राकालावधीत ज्यादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)