पुणे-मिरज लोहमार्ग दुहेरीकरणात शेतकऱ्यांवर अन्याय

कोरेगाव : प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांना निवेदन सादर करताना सचिन नलावडे, जयवंत घोरपडे, श्रीरंग गोडसे व विविध गावचे शेतकरी.

बेकायदा वृक्षतोड व गौणखनिज उत्खननाची चौकशी करण्याची मागणी

कोरेगाव – पुणे-मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरणाचे काम कोरेगाव तालुक्‍यात युध्दपातळीवर सुरू आहे. रेल्वे प्रशासन व त्यांच्या ठेकेदारांनी नियमांची पायमल्ली करत शेतकऱ्यांवर अन्याय सुरु केला आहे. बेकायदा वृक्षतोड व गौणखनिजाचे मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले असून, त्याची त्वरित चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी. येत्या 8 दिवसात कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा तांदुळवाडी, शिरढोण, ल्हासुर्णे, गोडसेवाडी, धामणेर, रहिमतपूर, बोरगाव, टकले व तारगाव येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिनकुमार नलावडे यांच्यासह जयवंत घोरपडे, डॉ. प्रमोद घोरपडे, श्रीरंग गोडसे, बाळासाहेब क्षीरसागर यांनी विविध गावच्या शेतकऱ्यांसमवेत प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांची भेट घेवून रेल्वे प्रशासन व ठेकेदारांकडून होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. यावेळी दोन निवेदने त्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांच्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन चौकशी केली जाणार असून, शासनाच्या नियमानुसार कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही प्रांताधिकाऱ्यांनी दिली.

लोहमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामध्ये झालेली संयुक्त मोजणी, गौणखनिज उत्खनन व विनामुल्यांकन बेकायदा वृक्षतोड करण्यात येत आहे. मोजणी देखील तांत्रिक उपकरणांच्या आधारे न करता, केवळ उरकण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. त्याचबरोबर भूसंपादन प्रक्रियेत राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार शेतकऱ्यांना मोबदला दिला जावा, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेत तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, दीपक चव्हाण, डॉ. प्रमोद घोरपडे, गणपत साळुंखे, शंकर घाडगे, विनायक घाडगे, रमेश घाडगे, उत्तम क्षीरसागर, प्रवीण क्षीरसागर, बाळासाहेब क्षीरसागर, सुनील क्षीरसागर, ऍड. महेश गोडसे, श्रीरंग गोडसे, किरण गोडसे, दीपक मतकर, किसन मतकर, मनोज ढाणे, अनिल गायकवाड, विठ्ठल घाडगे, विकास घाडगे, आशुतोष घाडगे, सतीश भोज, गणेश साळुंखे, राजेश घाडगे, विक्रम घाडगे, सुरेश थोरात, सुशील घोरपडे, प्रशांत निकम यांच्यासह शेतकऱ्यांनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)