धावडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार

File photo

कांबटवाडी वस्तीवरील कोळी बांधवांची पाण्यासाठी 12 महिने होतेयं ससेहोलपट

मेणवली – वाई तालुक्‍यातील धावडी ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराचा सामना कांबटवाडी वस्तीवरील (वाघमळा) कोळी बांधवाना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी पुरवणारी तुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यास येथील ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी व ग्रामसेवक गेली दोन वर्षांपासून द्वेषभावनेतून जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याने गेली दोन वर्ष दुष्काळाच्या झळा मुकाटपणे सहन कराव्या लागत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हक्काच्या पाण्याची सोय असतानाही वाघमळा वस्तीवरील महिलांच्या नशीबाला वर्षाचे बारा महिने दुष्काळ पाचवीला पुजला गेल्याने चार वर्षापासूनची बंद पाईपलाईन दुरुस्त करून पाण्यासाठी होत असलेली ससेहोलपट तात्काळ थांबवण्याची मागणी येथील लोकांनी केली आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून पांडवगडाच्या पायथ्याला कोळी समाजाची वस्ती असून कांबटवाडी (वाघमळा) नावाच्या वस्तीवर लहानमोठे सव्वाशे ते दीडशे लोक सुमारे 80 हुन अधिक गायी-म्हैशी व शेळ्या मेंढ्यासह वास्तव्यास आहेत. सदरची वस्ती धावडी ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली असून आजही शासनाच्या अनेक सोयीसुविधांसह मुलभूत हक्कापासून ही वस्ती वंचित आहे नव्हे वंचित ठेवली असल्याचे मत कोळी बांधवाकडून व्यक्त केले जात आहे.

धावडीपासून 3 कि.मी. अंतरावरील कांबटवाडीला अंदाजे 2 कि.मी. अंतरावर रेणुसे वस्तीजवळ वाईच्या पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडून हातपंप बसवून विद्युत मोटरने पाईपलाईनद्वारे पाण्याची सोय करण्यात आली होती. परंतु, काहीकाळ चाललेली ही योजना 2014 पासून पाईपलाईन तुटल्याच्या कारणावरून पूर्णतः बंद पडल्याने गेली चार वर्षांपासून येथील महिलांना दररोज दोन की मी पायपीट करून पाणी आणावे लागत असल्याने वाई पंचायत समिती व धावडी ग्रामपंचायतीच्या दृष्टीने ही शरमेची बाब म्हणावी लागेल. जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांनी तुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याचे आदेश देवूनही ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी वरिष्ठांच्या लेखी आदेशाला केराची टोपली दाखवत जाणीवपूर्वक जातीचे राजकारण होत असल्याचा आरोप कोळी बांधव करत आहेत.

सलग चार वर्षे येथील कोळी बांधव धावडी ग्रामपंचायतीकडे पाईपलाईन दुरुस्तीसाठी हात जोडून विनवण्या करूनही कोणाला घाम फुटत नाही. उलट पाण्यासह अन्य कुठलीही सुविधा नसताना वस्तीमधील प्रत्येकाची घरपट्टी व 400 रुपये इतकी पाणीपट्टी अडवणूक करत वसुल केली जात आहे.

पाईपलाईन दुरुस्तीचे काम ग्रामपंचायतीचे असतानाही दंडेलशाही दाखवत कोळी बांधवानाच दुरुस्तीचे फर्मान सोडण्यात येवुन सर्व खापर वस्तीच्या माथी मारले जात असल्याने संबंधित लोकांच्या विरुद्ध कोळी बांधवानी जिल्हाअधिकारी श्वेता सिंघल, कैलास शिंदे मुख्याधिकारी जिल्हा परिषद सातारा, उदयकुमार कुसुरकर गट विकास अधिकारी वाई पंचायत समिती, वाई तहसीलदार रमेश शेडगे याना सर्व ग्रामस्थांच्या सह्यांचे लेखी निवेदन दिले असून प्रशासनाने कांबटवाडी रहिवाशांची योग्य ती दखल घेवून न्याय द्यावा, अन्यथा हक्काच्या पाण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय कोळी बांधवांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)