चौकशीच्या नावाखाली महिलेला ठेवले डांबून

एसटी अधिकाऱ्यांचा प्रताप; सातारा बसस्थानकातील प्रकार

सातारा – बनावट ओळखपत्र बाळगल्याचा संशय व्यक्त करुन एका महिलेला चौकशीच्या नावाखाली सुमारे चार तास डांबुन ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सातारा बसस्थानकातील महिला अधिकाऱ्यांनीच हा प्रताप करुन दाखवल्याने त्यांच्या कार्यपध्दतीवरच संशय व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातील एक महिला शनिवारी साताऱ्यात शिक्षणासाठी असलेल्या तिच्या मुलाला भेटण्यासाठी आली होती. दरम्यान ती महिला ज्या बसमध्ये बसली होती त्या बसच्या वाहकाला तिच्याकडील सवलतीचे ओळखपत्र बनावट असल्याचा संशय आल्याने, त्याने वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर त्या महिलेला सातारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकांच्या खोलीत बसवण्यात आले.

एसटी महामंडळाच्या सहाय्यक वाहतूक नियंत्रक भाग्यश्री प्रभुणे यांच्यापुढे त्या महिलेची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्या महिलेला 72 हजार रुपये दंड भरण्याचे फर्मान प्रभुणे यांनी सोडल्याने हतबल महिलेने आपल्याकडे तेवढे पैसे नसल्याचे सांगितले. तरीही दंड भरावाच लागेल असे सांगत प्रभुणे यांनी त्या महिलेला चार तासाहून अधिक काळ खोलीतच बसवून ठेवले. दरम्यान याची माहिती त्या महिलेच्या मुलाला कळाल्यावर त्याने सोलापूर जिल्ह्यात पोलिस अधिकारी असलेल्या आपल्या नातेवाईकाला घडला प्रकार कळवला.

त्यानंतर त्या पोलिस अधिकाऱ्याने सातारा बसस्थानकातील पोलिसांना याबाबत माहिती विचारली असता, पोलिसांना यातील काहीच माहित नसल्याने बसस्थानक पोलिसही काही काळ बुचकळ्यात पडले. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा बसस्थानक चौकीतील पोलिसांनी तात्काळ आगार व्यवस्थापकांच्या कानावर हा प्रकार घातला.

त्यानंतर पोलिस व एसटीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मध्यस्तीने त्या महिलेची सुटका करण्यात आली. मात्र या कारवाई दरम्यान एसटीच्या त्या महिला अधिकाऱ्याची कार्यपध्दती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जर त्या महिलेचे ओळखपत्र बनावट होते तर त्या महिलेवर दंडात्मक कारवाई करण्यात टाळाटाळ का केली? ती महिला दंड भरण्यास सक्षम नसेल तर तिच्यावर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास असमर्थता का दाखवली? जर दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करायचीच नव्हती तर त्या महिलेला चार तास बसवून ठेवण्याचे नेमके कारण काय असावे? ओळखपत्र बघताच वाहकाने तर बनावट असल्याचे सांगितले, मग वरिष्ठांना ते ओळखण्यास चार तास कसे लागले? असे सवाल निर्माण झाले आहेत.
———————————————————————————————- 72 हजाराचे झाले दोन हजार

एसटीच्या वाहकाने बनावट ओळखपत्र असल्याच्या संशयावरून ज्या महिलेला अधिकाऱ्यांच्या पुढे उभे केले, त्या महिलेला प्रथम 72 हजार दंड नियमानुसार भरावा लागेल असे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्या महिलेच्या मुलाने फोनाफोनी केल्यानंतर संबंधीत महिला अधिकाऱ्याने तुझ्याकडे किती पैसे आहेत असा सवाल त्या महिलेला केला. त्यावर तिने फक्त दोन हजार असल्याचे सांगताच तेवढेच भर अन्‌ जा, असा सल्ला दिला गेला. त्यामुळे जर महिलेचे ओळखपत्र बनावट होते अन्‌ नियमानुसार 72 हजार दंड होता, तर 72 हजारांचे दोन हजार कसे काय झाले?
———————————————————————————————- आम्हाला कळवलेच नव्हते

बसस्थानकात एका महिलेला बनावट ओळखपत्र बाळगल्याच्या संशयावरून बसवून ठेवल्याचे आम्हाला माहित नव्हते. त्या प्रकाराबाबत आम्हाला एसटीकडून काहीच कळवले गेले नव्हते. मात्र जेव्हा आम्हाला फोनवरून विचारणा होऊ लागली तेव्हा आम्ही या प्रकाराची माहिती घेत त्या महिलेवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा पोलिस ठाण्यात तक्रार द्या असे संबंधीतांना सांगितले. असे बसस्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रभातला सांगितले.
———————————————————————————————- डीएम बोलेनातच

घडला प्रकाराची एसटीच्या वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सातारा आगाराच्या व्यवस्थापक स्मिता कुलकर्णी यांनी मी तुम्हाला थोड्यावेळानी सांगते असे म्हणत फोन बंद केला. त्यानंतर कनिष्ठांना सांगुन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)