युतीचा सातारा लोकसभा पॅटर्न कराड उत्तरेत

मनोज घोरपडेंना लॉटरी? विधानसभा उमेदवारीची मतदारसंघात चर्चा
सुरेश डुबल

कराड – विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन-चार महिने शिल्लक राहिल्याने कराड उत्तर मध्ये बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. युतीचा सातारा लोकसभा पॅटर्न कराड उत्तर मध्ये राबवण्याची शक्‍यता आहे. यामुळेच भाजपचे कराड उत्तरचे संभाव्य उमेदवार मनोज घोरपडे हे शिवसेनेतून निवडणूक लढवतील, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

देशाबरोबरच राज्यातही पुन्हा युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत सेना भाजपाला प्रत्येकी किती जागा मिळतील, हे काही दिवसातच कळेल. मात्र कराड उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्याने एकंदरीत लोकसभेसारखी स्थिती होण्याच्या चर्चेला ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वीच मनोज घोरपडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपली विकासकामे व इरादे स्पष्ट केल्याने यात पडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही मनोज घोरपडेंवर विशेष लक्ष दिले असून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे. येणाऱ्या काळात यावर सविस्तर आखणी केली जाणार असून लोकसभा पॅटर्नवर सकारात्मक चर्चा होईल.

ज्याप्रमाणे सातारा लोकसभा मतदारसंघ हा सेनेसाठी राखीव असताना याठिकाणी भाजपचे नरेंद्र पाटील यांना ऐनवेळी सेनेमध्ये घेण्यात आले, आणि निवडणुकीला सामोरे जावे लागले. नेमका तोच फॉर्मुला कराड उत्तर मध्ये देखील पहावयास मिळेल. मनोज घोरपडे यांनी विधानसभेच्या पहिल्या खेपेलाच दमदार कामगिरी केली. शिवसेनेचा गट जिल्ह्यात मजबूत नाही. जे शिवसैनिक आहेत, त्यात एकमत नाही. त्यामुळेच येथे तोडीस तोड देणारा उमेदवार शिवसेनेमध्ये नाही. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील ओळखले आहे. तर इकडे मनोज घोरपडे यांनी मागील निवडणुकीत दमदार परफॉर्मर्स केल्याने व त्यांच्या सुरू असलेल्या विकासकामांच्या धडपडीमुळे येथे सहज विजय मिळवता येईल. अशी युतीच्या नेत्यांची धारणा आहे.

मागील पाच वर्षांत सरकारने राज्यात कामाचा धडाका लावला. यात घोरपडेंनी देखील आपला मतदारसंघ विकासाने बांधून ठेवला आहे. याच कारणास्तव ते आमदारकीसाठी इच्छुक असून वेळप्रसंगी सेनेतून का होईना उभे राहून राज्याच्या विकासात हातभार लावण्याची इच्छा मनोज घोरपडेंची आहे. त्यातच शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे कराड उत्तरमध्ये कोणीही जम बसवू शकलेले नाही. धैर्यशील कदमांच्या शिवसेना प्रवेशाच्या फक्त वावड्याच उठत आहेत. यावर कदम यांनीही मौन धारण केल्याने त्यांचे कदम कुठे पडतील हे माहिती नाही. त्यांना शिवसेनेने पक्षात घेतले तरी त्यांची उमेदवारी निश्‍चित नसेल, कारण कोणीही या आणि तिकीट घेऊन जा अशी स्थिती युतीमध्ये नसते. तिथे काम करणाऱ्यालाच न्याय दिला जातो आणि त्याच्याच पाठीशी ताकत लावली जाते.

कराड उत्तर मतदारसंघ भाजपचा की सेनेचा या भानगडीत न पडता याच्यावर उत्तम पर्याय म्हणून सातारा लोकसभेचा फॉर्मुला राबवण्याची युतीच्या नेत्यांची शक्‍यता आहे. आणि नेमके यामुळेच मनोज घोरपडे यांना शिवसेनेच्या माध्यमातून का होईना, विधानसभा लढवण्याची व ती जिंकण्याची देखील संधी चालून आली आहे. गेल्या पाच वर्षात युतीचा दबदबा वाढल्याने निवडणुकीत घोरपडे यांचे वजन देखील वाढणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात वेळ न घालवता युतीने भाजपचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना ऐनवेळी शिवसेनेत पाठवून तेथून निवडणूक लढवण्यास सांगितले होते. तेव्हा जागा वाटपाचा तिढा सुटला होता. विद्यमान खासदारांना आव्हान देखील युतीमुळे उभे राहिले होते. त्यामुळे येणाऱ्या काळातही कराड उत्तरमध्ये युतीचे उमेदवार म्हणून मनोज घोरपडे यांची उमेदवारी लोकसभा पॅटर्न प्रमाणे निश्‍चित होईल, अशी शक्‍यता सध्या तरी चांगलीच बळावली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)