मुलभूत गरजांमध्येच अडलाय सातारा

सम्राट गायकवाड

देश एका बाजूला महासत्ता होण्याचे स्वप्न पहातोय. तर दुसऱ्या बाजूला साताऱ्याच्या शेजारील पुणे व कोल्हापूरची विकास दौड झपाट्याने सुरू आहे. असे असताना सातारा जिल्हा केवळ मुलभूत गरजा पुर्ण करण्यापुरताच मर्यादित राहताना दिसून येतोय. मागील काही वर्षात जिल्ह्याची लोकसंख्या वाढली असली तरी नव्याने उद्योग अथवा शैक्षणिक संस्था या ठिकाणी आलेल्या नाहीत. परिणामी येथील युवक शिक्षण व रोजगारासाठी पुणे, मुंबई व कोल्हापूरची वाट धरत आहे. यामागे स्थानिक लोकप्रतिनिधींची खुजी विचारधारा हे प्रमुख कारण आहे. कारण, येथील प्रलंबित समस्या कायमच्या सोडविल्या तर नव्याने आव्हान उभे राहण्याची त्यांच्या मनात भिती आहे. त्यामुळे मतदारसंघात सत्ताधारी कोण व विरोधक कोण हे सामंज्यासाने ठरविण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून यंदा पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पुर्वेकडील तालुक्‍यांमध्ये दुष्काळ निर्माण झाला आहे.

हा दुष्काळ काही नवीन नाही तो निसर्गनिर्मितच आहे. मात्र, त्यावर मात करण्यासाठी जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील धरणातून पाण्याची तरतूद त्या तालुक्‍यांसाठी करून ठेवण्यात आली आहे. परंतु राजकीय इच्छाशक्ती अभावी अद्याप त्या ठिकाणी पुर्ण क्षमतेने पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे आता माण तालुक्‍यात तर स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबाचे प्रमाण वाढले आहे. हे स्थलांतरण तेथील जलनायक व जलयुक्त शिवारचे तुणतुणे वाजविणाऱ्या लोकप्रतिनिधी व शासनाच्या कामगिरीवर प्रश्‍न चिन्ह निर्माण करणारे आहे. माण प्रमाणेच फलटण तालुक्‍यात देखील दुष्काळ निर्माण झाला असून आता तेथील भगीरथांना पुन्हा एकदा टॅंकरनेच पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचप्रमाणे माजी कृष्णा खोरे मंत्री असलेले विद्यमान आमदारांना खटाव तालुक्‍याचा दुष्काळ दूर करण्यासाठी सिंचनाची कामे करता आली नाहीत. मात्र, आता निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे बॅनर लावून ते टॅंकरने पाणी वाटप करित आहेत. तर खासदारांनी सिंचनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी दिल्लीत गर्जना करणे अपेक्षित असताना ते खटाव तालुक्‍यातील जनतेला नक्षलवादी होण्याचे बेजबाबदार विधाने करून जनतेची दिशाभूल करित आहेत. मात्र, हे सर्व युवा पिढीने उघड्या डोळ्याने पहात आहे. या युवा पिढीच्या हातात स्वस्त दरात इंटरनेट व स्मार्ट फोन आले आहेत. देशात, राज्यात व शेजारील जिल्ह्यात होणारी विकासकामे व बदलते तंत्रज्ञानाची माहिती त्यांना सहज उपलब्ध होत आहे.

दुष्काळी तालुक्‍यांमध्ये सक्षम इंजिनाद्वारे उचलून पाणी देता येवू शकते हे देखील त्यांना अवगत झाले आहे. तसेच विद्यमान लोकप्रतिनिधी येथील जनतेला केवळ मुलभूत समस्यांमध्येच अडकवून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेत आहेत, हे देखील आता युवा पिढीला समजू लागले आहे. परिणामी लोकप्रतिनिधी, प्रशासन व सरकार यांना मागील पिढीची दिशाभूल करण्यामध्ये निश्‍चित यश आले असेल. मात्र, युवा पिढी तथा मतदार आता मुलभूत गरजा भागविणारे नव्हे तर जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर नेणाऱ्या लोकप्रतिनिधीलाच निवडून देतील हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)