सातारा जिल्हा कॉंग्रेस लढतेयं सेनापतीशिवाय!

पृथ्वीराज चव्हाणांनी लक्ष देण्याची गरज; गोरे रमलेत माण व कोरेगावात

प्रशांत जाधव

सातारा – आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बराच काळ सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसनेही पक्षीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, सातारा जिल्हा कॉंग्रेसला रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या राजीनाम्यानंतर अद्याप अध्यक्षच मिळाला नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील कॉंग्रेस सेनापतीशिवाय लढण्याची शक्‍यता ठळक दिसत आहे.

एकेकाळी सत्तेतील सर्वात मोठा ताकदवान पक्ष असलेल्या कॉंग्रेसला सर्वत्रच फुटीचे ग्रहण लागले आहे. सातारा जिल्ह्यात तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे नेतृत्व मानत असलेल्या नेत्यांच्या आपापसातील कळवंडीत कॉंग्रेस पुरतीच लयाला गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. जिल्हा कॉंग्रेसमधील आमदार जयकुमार गोरे व माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यातून विस्तवही जात नव्हता.

त्या वादावर तोडगा काढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकांकडे अध्यक्षपद स्विकारण्यासाठी चाचपणी केली. मात्र, या दोन नेत्यांच्या वादात आपला राजकीय बळी देण्यास कोणीही इच्छुक नसल्याने अखेर आमदार गोरेंनी केलेल्या खेळीला यश आले अन्‌ फलटणच्या रणजित निंबाळकरांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.

त्यानंतरही कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच आली. कॉंग्रेस वाढीसाठी घोषणा करणाऱ्या निंबाळकरांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाना साधण्यास सुरूवात केली. दरम्यान गोरेंची निंबाळकरांशी गट्टी जमली होती. मात्र, एकाच भात्यात दोन बाण फार काळ राहणार नसल्याचे हेरत गोरेंनी आपल्या मित्राला भाजपत दाखल करून खासदार केले.

निंबाळकर भाजपत गेल्याने राज्यात जिल्हा कॉंग्रेसमधील बेदीलीची चर्चा झाली. त्यावरच न थांबता अनेकांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त केला. असे घडणे स्वभाविक होते. कारण गोरे, खासदार निंबाळकर, माजी आमदार पाटील म्हणजे चव्हाणांचे डावे उजवे म्हणून एकेकाळी राज्यात मिरवत होते. मग असे असताना गोरे- पाटील वादावर त्यांना तोडगा काढता आला नाही.

खासदार निंबाळकरांचा भाजप प्रवेश थांबवता आला नाही. तसेच निंबाळकरांच्या उमेदवारीनंतर गोरे त्यांचा उघड प्रचार करत होते. पृथ्वीराज चव्हाणांनी संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ दहिवडीतील सभेला संबोधित करताना गोरेंच्या या कृतीबद्दल एकही शब्द न काढल्याने चर्चेला उधाण आले.

त्यानंतर तरी बाबा लक्ष घालतील अन्‌ कॉंग्रेसची पडझड रोखतील, अशी भाबडी अशा राखून असलेल्या कॉंग्रेसप्रेमींच्या पदरी पुन्हा निराशाच आली. एका बाजूला कॉंग्रेसची वरची फळी भाजप- सेनेच्या प्रेमात पडली. त्याचप्रमाणे गावपातळीवरील कार्यकर्तेही स्वत:च्या अस्तित्वासाठी कॉंग्रेसला रामराम करू लागलेत. कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा निंबाळकरांनी राजीनामा देऊन चार महिन्यांचा काळ उलटला, दुसऱ्या बाजूला विधानसभेची रणधुमाळीही अवघ्या काही महिन्यांवर आली असतानाही कॉंग्रेसला जिल्हाध्यक्षही नेमता आला नसल्याने कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात आहेत.

हीच अवस्था कायम राहिली तर विधानसभेच्या लढाईऐवजी स्वत:च्या अस्तित्वासाठीच कॉंग्रेसला लढावे लागेल. कारण सध्या कॉंग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण सोडले तर भविष्यात याच पक्षात राहण्याची मानसिकता कोणाचीच दिसत नाही. ज्या गोरेंना कॉंग्रेसचे भविष्य म्हणून पाहिले जात होते त्या गोरेंनी पाणीप्रश्‍नाच्या नावाखाली भाजप नेतृत्वासोबत केलेली जवळीक नक्कीच कॉंग्रेसला पाणी पाजेल, अशी चर्चा सुरू आहे. गोरे सध्या कोणत्या पक्षात आहेत याचा अंदाज बांधता येत नसला तरी ते माण, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात स्वत:चा गट बांधत आहेत हे तरी सध्या लपून राहिलेले नाही.

जिल्हाध्यक्ष नेमला नाही की मिळाला नाही
ज्या कॉंग्रेस पक्षाचा साधा ब्लॉकचा अध्यक्ष झालं तरी कार्यकर्त्यांच्या अंगात बारा हत्तीचे बळ येत होते. त्याच कॉंग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्ष नेमता आला नाही. त्यामुळे खरच कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष नेमत नाही की सध्या तरी कोणी या काटेरी पदाला स्वीकारण्यास इच्छुक नाही याचीच चर्चा सुरू आहे.

बाबा आता मनावर घ्याच
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणजे एक सुसंस्कृंत नेता तसेच गांधी परिवाराचा विश्‍वासू चेहरा म्हणून देशाला परिचित आहेत. मात्र, केवळ याच ओळखीने आता जिल्हा कॉंग्रेसची पडझड रोखता येणार नाही. त्यामुळे बाबांनी आता मनापासून पक्षातील बेदीलीवर तोडगा काढून नव्याने बांधणी करणे गरजेचे आहे.

आ. गोरेंना करायचयं जिल्ह्याचे नेतृत्व
आ. गोरेंचा जिल्हा परिषद ते आमदारकी हा सगळा प्रवास कॉंग्रेस पक्षातच झाला. मात्र, आ. गोरेंच्या महत्वाकाक्षांना घुमारे फुटल्यानेच आनंदराव नाना अन्‌ त्यांच्यात ठिणगी पडली. त्यानंतर गोरेंनी रणजित निंबाळकरांना खासदार करून मूळ भाजप नेत्यांवर डाव टाकला. काल परवा तर कोरेगावचा माढा करून टाकणार अशी घोषणा करून त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला खिंडीत गाठले आहे. गोरेंच्या या कृतीतून त्यांच्या मनातील जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची महत्वाकांक्षा स्पष्ट झाल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)