कवठे – सुरूर (ता. वाई) येथील बेघर वस्तीत गायीच्या चाऱ्यात अचानक झालेल्या गावठी बॉम्बस्फोटामुळे गायीचा जबडा पूर्णपणे फाटला व खालील जबड्याचे तुकडे झाले आहेत. सुरूरच्या पोलीस पाटील निर्मला पवार यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे. सुरूर बेघर वसाहतीतील (माळ) संतोष शंकर पवार यांचे घर असून त्यांच्याकडे पाळीव गायी आहेत. घराशेजारी असणाऱ्या झाडाच्या सावलीत सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास गाय बांधून चारा घालून ते घरात गेले त्यावेळी क्षणार्धातच स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पहिले असता गायीच्या तोंडातच गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये गायीच्या तोंडाचे तुकडे झाल्याचे दिसत होते.
गायीच्या चाऱ्यात कोणी अज्ञात व्यक्तीने गावठी बॉम्ब ठेवला असावा व तो गायीने खाताच त्याचा स्फोट होवून गायीच्या तोंडाचे तुकडे झाले होते. संतोष पवार यांनी घटनेची माहिती सुरूर येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक व डॉ. पाटील यांना कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन गाभण स्थितीतील गाईची पाहणी केली असता तिचा जबडा फाटला असून खालील जबड्याचे पूर्णपणे तुकडे झाल्याचे दिसून आले. उपलब्ध औषधांचा वापर करून या दोन्ही डॉक्टरांनी गंभीर जखमी गायीवर उपचार केले. मात्र, पुढील उपचाराबाबत कार्यवाही न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
तपास करण्याची मागणी
वाई तालुक्यातील सुरूर गाव सातारा – पुणे महामार्गावर वसलेले आहे. याठिकाणी दावजी पाटील हे मंदिर असून राज्यातील अनेक अनोळखी भाविकांची कायम ये जा असते . त्यामुळे सुरूर गावामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे घडले आहेत. याठिकाणी शेतातील रानडुकरे मारण्यासाठी हि लोक गावठी बॉम्बचा वापर करताना व साठा असल्याचे आढळून आले आहे. पोलीस प्रशासनाने त्या दिशेने तपास करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.