मलकापूर कुणाचे? : तर्कवितर्कांना मिळणार पुर्णविराम

मलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे दोन्ही पक्षांनी सुशिक्षित महिला उमेदवार दिलेल्या आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉ. सारिका प्रशांत गावडे, आणि राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्यावतीने नीलम धनंजय येडगे यांच्यामध्ये नगराध्यक्षपदाच्या पदासाठी निवडणूक होत आहे. यामुळे मतदार राजा आता डॉ. सारिका गावडे यांना की नीलम येडगे यांना संधी देत नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवणार? हे आजच्या निकालावरुन स्पष्ट होईल.

– उमेश सुतार

कराड -मलकापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक ही आगामी विधानसभेची सेमिफायनल समजली जात असल्याने या निवडणुकीत कॉंग्रेस व भाजपाच्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची कसलीही कसर दोन्ही गटाच्या नेत्यांनी सोडलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली. मलकापूरच्या मतदारांनी दोन्हीकडील नेत्यांचे तसेच प्रत्यक्ष उमेदवारांचे मत ऐकून रविवारी आपले मत मतपेटीत बंद केले. मतदार राजाने कोणता निर्णय घेतला आहे, हे आज निकालानंतर स्पष्ट होणार असून तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळणार आहे. यामुळे या निकालाकडे सर्वाच्याच नजरा लागून राहिल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलकापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक ही पक्षीय चिन्हांवर लढवली जात असून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूरचे नेते मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार तर नामदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे अधिकृत उमेदवार यांच्यात थेट लढत होत असल्याने या निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून अनेक दिग्गजांनी प्रचारसभांचे माध्यमातून मलकापूरला हजेरी लावली होती. राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने एक ते नऊ प्रभागामध्ये आपले उमेदवार उभे करत असताना महिलांना 50 टक्के आरक्षण असताना पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक महिलांना उमेदवारी दिल्याने याचा कितपत फायदा होतोय. यावरही निकाल अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. तर भारतीय जनता पार्टीने प्रत्येक प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार देत सत्ताधाऱ्यांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मलकापूरची निवडणूक ही पक्षीय चिन्हांवर होत असल्याने दोन पक्षांमधील सत्तासंघर्ष यानिमित्ताने जनतेसमोर आला आहे.

वास्तविक पाहता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप करण्यात आले. एकाने आरोप करायचा दुसऱ्यांनी त्या आरोपाचे खंडन करायचे, असा प्रचाराचा प्रकार या ठिकाणी दिसून आला. दरम्यान, काही प्रचारसभांमधून एकमेकांवर झालेली वैयक्तिक टीका अनेकांना झोंबल्याचे चित्र दिसून आले. प्रचारामध्ये दोन्ही पक्षाकडील उमेदवारांनी प्रत्येक मतदार राजाची प्रत्यक्ष गाठ भेट घेऊन आपण कसे मलकापूरच्या विकासासाठी सक्षम आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र खरे पाहता मलकापूर हे शिंदेंचे गाव म्हणून सर्वपरिचित आहे. त्यातच प्रभाग क्रमांक तीन व प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिंदे विरुद्ध शिंदे अशी लढत होत असल्याने या लढतीकडे संपूर्ण मलकापूर शहराचे लक्ष लागून राहिलेले आहे.

निवडणुकीच्या घडामोडीत दोन्ही गटाकडून एक हाती सत्तेचा दावा केला जात आहे. परंतु कोणत्याही एका पक्षाला एक हाती द्यायची की उमेदवार पाहून मतदान करायचे? याचा निर्णय मलकापूरच्या मतदारराजाच्या हातात आहे. गतवेळच्या निवडणुकीत मनोहर शिंदे यांनी 17-0 करीत एक हाती सत्ता घेतली होती. ही वस्तुस्थिती असली तरी त्यावेळची परिस्थिती सध्या आहे का? याचाही विचार होणे आवश्‍यक आहे. यावेळच्या निवडणुकीत काही प्रभागात मोठा संघर्ष असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे यावेळचा निकाल कसा लागेल म्हणणे हे धाडसाचेच होईल.

राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार आनंदराव पाटील, आमदार विश्‍वजित कदम, आमदार जयकुमार गोरे यांनी सभा घेऊन कॉंग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील या पद्धतीने प्रचारात उडी घेतली होती तर माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवानेते उदयसिंह पाटील, राजाभाऊ पाटील, अजित पाटील-चिखलीकर, बंडानाना जगताप, शिवराज मोरे, प्रदीप पाटील, धनाजी काटकर, जाकिर पठाण, आदिल मोमीन, पंचायत समिती सभापती फरीदा इनामदार यांनी प्रत्येक प्रभागात पदयात्रा काढून कॉंग्रेसला अच्छे दिन आणण्याचा प्रयत्न केला आहे.

तर दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पार्टीच्यावतीने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास मंत्री रणजीत पाटील, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, पाशा पटेल यांनी सभा घेऊन केंद्रात-राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तसेच कराडचा नगराध्यक्ष भाजपाचा आहे. आता मलकापूरची सत्ताही भाजपाकडे दिल्यास मलकापूरचा विकास होईल असे आश्‍वासन दिले आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा मलकापूर नगरपरिषदेची सत्ता परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

यामध्ये ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले, शेतीमित्र अशोकराव थोरात, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, विनायक भोसले, पैलवान आनंदराव मोहिते, महादेव पवार, तानाजी देशमुख यांनी मलकापूर शहर पिंजून काढले आहे. एकंदरीत या वातावरणामुळे मलकापूर निवडणुकीच्या अनुषंगाने कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा प्रचार सुरु आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत होते. मलकापूर नगरपालिकेची निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे.

वास्तविक पाहता मलकापूर नगरपरिषदेची सत्ता टिकवण्यासाठी व सत्ता परिवर्तन करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांच्यापर्यंत प्रचाराची सीमा आखली गेली पाहिजे होती. दरम्यान घडलेले नाट्य सर्व जनतेसमोर आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेटमंत्री मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर कॉंग्रेसचे माजीमंत्री व विद्यमान आमदार उतरणे हे स्वाभाविकच होते. राजकारणात सर्वकाही चालते आणि सत्तेसाठी राजकीय पक्ष काहीही करतात असे बोलले जाते, याचे प्रत्यंतर मलकापुर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वानाच पहावयास मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)