सराफ व्यावसायिकाकडून शेतकऱ्यांना 1 कोटी 29 लाखांचा गंडा

तक्रारीनंतर संशयिताची आत्महत्येची धमकी

वैभव धामणकर व निलम धामणकर यांच्यावर शेतकऱ्यांना गंडा घातल्याच्या फिर्यादीनंतर हे दांम्पत्य राहत्या घरातून फरार झाले आहे. यानंतर फिर्यादी शेतकऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधत तुम्ही माझ्या विषयी पोलिसात तक्रार दाखल केली असली तरी माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे मला आत्महत्या करावी लागेल असे धमकविल्याने संबंधित शेतकऱ्यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

शिरवळ  -दीड वर्षात पैसे दामदुप्पट करुन देते असे सांगत खंडाळा येथील सराफ व्यावसायिक वैभव धामणकर व नीलम धामणकर या दांपत्याने खंडाळा तालुक्‍यातील केसुर्डी आणि पुरंदर तालुक्‍यातील परिंचे येथील महिलांना तसेच शेतकऱ्यांना सुमारे 1 कोटी 29 लाख 50 हजारांना गंडा घातला आहे. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर सराफ दांपत्य फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, खंडाळा येथील वैभव ज्वेलर्सचे मालक वैभव भास्कर धामणकर व त्यांची पत्नी नीलम धामणकर यांनी केसुर्डी येथील दोन शेतकरी व परिंचे तालुका पुरंदर येथील तीन शेतकरी महिला यांना तुम्ही आमच्याकडे रक्कम गुंतवा तुम्हाला आम्ही चांगला फायदा करून देतो व सदरील रकमेचा चेक तुम्हाला देऊ किंवा सदरील डबल रक्कम करून तुमच्या बॅंक अकाउंटवर दीड वर्षाने ट्रान्सफर करू असे सांगितले. तसेच आमचा सोन्याची बिस्किटे तयार करण्याचा व्यवसाय आहे. ही बिस्कीटे आम्ही परदेशात पाठवतो त्यामधून आम्हाला भरपूर फायदा होतो त्याचप्रमाणे आमची वाई व खंडाळा येथे वैभव गोल्ड अँड ज्वेलर्स नावाची आलिशान दुकाने आहेत असे सांगून शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादित केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर एकूण पाच शेतकऱ्यांकडून एक कोटी 29 लाख 50 हजार रुपये इतकी रक्कम धनादेशाद्वारे स्वीकारली. त्यानंतर सदर रक्कम दीड वर्षाचा कालावधी  लोटल्याने त्या शेतकऱ्यांनी वैभव धामणकर व त्यांच्या पत्नी यांच्याशी संपर्क साधला व पैशाची मागणी केली असता त्यांनी घेतलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तसेच काही शेतकऱ्यांना बॅंक खात्यावर रक्कम नसतानाचे धनादेश दिले ते धनादेश न वटल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर वैभव गोल्डचे मालक वैभव धामणकर व त्यांची पत्नी नीलम यांच्या विरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

याचा पुढील तपास अभिजीत पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण हे करीत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख व अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील तसेच फलटण विभागाचे पोलीस अधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलीस नाईक सचिन वीर प्रशांत धुमाळ हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)