सातारा बनले वाहतूक कोंडीचे शहर!

संदीप राक्षे

शहरामधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे मुख्य रस्त्यापेक्षा अंतर्गत सेवा रस्ते व वर्दळीचे चौक येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे साताऱ्याचा श्‍वास कोंडला गेला आहे. पोवई नाका ते राजवाडा या दीड किलोमीटरच्या परिघात वाहनांची अडथळ्यांची शर्यत सुरू आहे. ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे म्हणूनच वाहतूक कोंडी होते, हे एकमेव कारण नाही. हे काम नव्हते त्यावेळीही वाहतुकीच्या कोंडीला तोंड देतच नागरिकांना मार्ग काढावा लागत होता. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे त्यात भर पडली आहे. वाहतुकीचा खरा बोजवारा उडला आहे तो शहरात ठिकठिकाणी माजलेल्या अतिक्रमणमुळे आणि त्या अतिक्रमणांना असणाऱ्या राजकीय पाठिंब्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत शहर गुदमरले आहे. त्यात पावसाळ्यापूर्वी रस्ते तंदुरूस्त ठेवण्यात पालिकेने हलगर्जीपणा केल्यामुळे बहुतेक रस्त्यांना खड्ड्यांनी ग्रासले आहे. खड्ड्यातून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. नगरपालिका, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांना एकत्रित आणत जिल्हा प्रशासनाने काही उपाय केले तरच या कोंडीतून शहर मुक्त होऊ शकते.

सेव्हन स्टार चौक
सातारा मध्यवर्ती बसस्थानक ते मार्केट यार्ड कॉर्नर यादरम्यान वाहतुकीची कोंडी प्रचंड असल्याने केवळ अर्ध्या किलोमीटरचे अंतर तोडून पोवई नाक्‍यावर पोहचायला अर्धा तास जातो. एसटी बसच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडणाऱ्या बसमुळे वाहनांना येथे ब्रेक लागतोच. रिक्षा स्टॅन्ड, विक्रेत्यांची अतिक्रमणे यामुळे येथे वाहतुकीने कोंडी गाठली आहे. सकाळी साडेनऊपर्यंत चालणाऱ्या मंडईने ट्रॅफिक जामला हातभार लावला आहे.

मोनार्क चौकात पोलीस मामा कोमात
गोडोली, कोडोलीकडून येणारी महामर्गावरील वाहतूक, शाहूनगर व सातारा शहर यांना जोडणाऱ्या मोनार्क चौकावर सध्या वाहनांचा प्रचंड ताण आहे. बढिये पेट्रोल पंप ते एसटी कॉलनी, पेंढारकर चौक ते महाराजा हॉटेल या दोन्ही मार्गांवर होणारी वाहतूक असुविधांमुळे अडचणीत आहे. अरूंद रस्त्यांवर अतिक्रमणांची गर्दी, पार्किंगचा अभाव, रस्त्यातले खड्डे यामुळे प्राधिकरणाच्या दारातील वाहतुकीची कोंडी थेट मरिआई कॉम्प्लेक्‍सच्या दारात पोहचली आहे.

पुन्हा एकेरीचा प्रयोग
पोवई नाक्‍यावर “ग्रेड सेपरेटर’चे काम सुरू झाल्यानंतर एकेरीला स्थगिती देण्यात आली. सर्व रस्त्यांवर दुहेरी वाहतूक सुरू झाली. परंतु, त्यामुळेही काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी व्हायला लागली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एकंदरीत वाहतुकीचा आढावा घेतल्यानंतर वाहतुकीमध्ये बदल करणारे आदेश काढले आहेत. त्यानुसार शहरात पुन्हा एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नव्या निर्णयानुसार राजपथावर शाहू चौक ते मोती चौक एकेरी वाहतुकीसाठी वापरायचा आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पथावर मौती चौकाकडून पोवई नाक्‍याकडे जाताना मोती चौक ते पोलीस मुख्यालय हा सर्व वाहनांसाठी एकेरी वाहतुकीसाठी वापरायचा आहे. या दोन मुख्य रस्त्यांखेरीज काही अंतर्गत रस्त्यांवरही एकेरी वाहतुकीचा आदेश आहे.

नव्या आदेशानुसार राजधानी टॉवर्ससमोर “वनसाइड पार्किंग झोन’ तयार करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रण शाखा ते शाहू चौक ते अलंकार हॉल ते मौती चौक रस्त्यांवर सम-विषम तारखांचे “पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत. मौती चौक ते पोलीस मुख्यालय रस्त्यांवर सम-विषम तारखांचे “पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत. प्रिया व्हरायटी कॉर्नर ते मनाली हॉटेल रस्त्यावर सम-विषम तारखांचे “पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नवीन आर. टी. ओ. ऑफिस चौक ते केबीपी कॉलेज रस्त्यावर सम-विषम तारखांचे “पार्किंग झोन’ तयार करण्यात आले आहेत. राजपथावरील कमानी हौद ते शिर्के शाळा जाणाऱ्या मार्गावर कमानी हौद येथील रस्ता अरुंद आहे. त्यामुळे सर्व वाहनांकरिता कमानी हौदाजवळ “नो पार्किंग झोन’ तयार करण्यात आला आहे. शनिवार पेठेत न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळील सोन्या मारुती मंदिरपासून 100 मीटर अंतरावर चारचाकी वाहनांसाठी “नो पार्किंग झोन’, तसेच सोन्या मारुती मंदिर ते नवीन मराठी शाळेसमोरील गेटपर्यंत सर्व वाहनांकरिता “नो पार्किंग झोन’ करण्यात आला आहे.

पारंगे चौकाचे दुखणेच वेगळे
कण्हेर कालव्याचा पूल खचल्याने बरीच वाहतूक जरंडेश्वर चौकातून थेट पोवई नाक्‍याकडे मिलिंद सोसायटी मार्गाकडून वळवण्यात आली आहे. पारंगे चौकात अनधिकृत स्पीड ब्रेकर, तीव्र उतार, वाहतुकीला नियंत्रित करणारी सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहतुकीचा गोंधळ अपघाताला निमंत्रण देणारा आहे.

सुभाषचंद्र बोस चौक
येथील सुभाषचंद्र बोस चौकात दोन्ही बाजूला दिशादर्शक नाहीत, त्यात बॅरिकेटिंगचा अडथळा त्यामुळे या चौकात कायमच वाहतुकीची कसरत असते. मध्यवर्ती आगाराकडून येणारा हा रस्ता तीव्र उताराचा असल्याने येथे वाहतूक विभागाचे पोलीस असणे आवश्‍यक आहे.

पोवई नाका ते शाहू चौक या दरम्यानची वाहतूक ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे विस्कळीत झाली आहे. या ग्रेडसेपरेटरची स्लॅब भरणी येत्या जुलैअखेर पूर्णत्वाला जात आहे. मात्र, संथ कामामुळे नाक्‍यावर ग्रेड सेपरेटरच्या दुतर्फा पावसाच्या रिपरिपीमुळे रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरूमाचा अक्षरशः चिखल झाला आहे. ग्रेड सेपरेटरच्या धोकादायक सळ्या रस्त्यावर आलेल्या असताना येथेच वाहनांची घसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

चांदणी चौक
ज्याप्रमाणे सातारा बसस्थानक, पोवईनाका या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होते, त्याचप्रमाणे राजवाडा येथील चांदणी चौकातही नेहमी वाहतुकीची कोंडी झालेली पहावयास मिळते. बोगद्याकडून येणारी वाहतूक तसेच शहरातून राजवाड्याकडे जाणारी वाहतूक याशिवाय कास, ठोसेघर, सज्जनगड या पर्यटनस्थळांने जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असून पर्यटकांना या चौकातूनच पुढे जावे लागते. त्यामुळे नेहमीच या चौकात वाहतुकीची बोंब असते. त्यात याठिकाणी सिग्नल यंत्रणाही नाही. वाहतूक पोलीस असतात मात्र कधीतरी. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

समर्थ मंदिर चौक
कास, बामणोली, ठोसेघर, सज्जनगड व परळीकडून साताऱ्यात येण्यासाठी या चौकाला पर्याय नाही. मात्र अरूंद रस्ता, डावीकडे रिक्षा स्टॉप. त्याला लागूनच असणारा एसटी थांबा यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहतुकीने येथे अपघाताची शक्‍यता वाढली आहे. वाहतूक विभागाचे कर्मचारी येथे अधिक प्रमाणात गरजेचे असताना अवघ्या दोन कर्मचाऱ्यांवर वाहतुकीचा गाडा हाकावा लागतो. येथील अरूंद रस्त्यांवर कास व ठोसेघरकडे जाणाऱ्या एसटी बसेससह मोठी वाहने याच चौकातून जात असल्याने वाहतुकीची कोंडी डोकेदुखीचा भाग बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)