सासवडचे नागरी “असुविधा’ केंद्र

पुरंदर तहसीलच्या छोट्या जागेत कामकाज; पाणी, स्वच्छतागृह, बाकडेही नाहीत

सासवड – पुरंदर तालुक्‍यातील शाळा, महाविद्यालय प्रवेशांसाठी पालक व विद्यार्थ्यांची लगबग चालू आहे. याकरिता रहिवासी दाखला, उत्पन्नाचे दाखला, जातीचा दाखला यासह अन्य सरकारी कागदपत्रे असल्याशिवाय कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळत नाही. याकरिता पुरंदर तहसिल कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात अशा कागदपत्रांसाठी विद्यार्थी, पालकांची झुंबड उडाली आहे. याकरिता रांगा लागल्या आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांना दाखल्यांसाठी तासन्‌ तास रांगात उभे राहावे लागत आहे.

सासवडचे नागरी सुविधा केंद्र अगोदर तहसील कार्यालयाच्या पाठीमागील इमारतीत होते. मात्र, या ठिकाणची भिंत पावसाळ्यात पडल्यामुळे हे नागरी सुविधा केंद्र इमारतीच्या आतील भागात स्थलांतरित करण्यात आले. मात्र, या ठिकाणी नागरी सुविधा केंद्र आहे की नाही, असा प्रश्‍न निर्माण व्हावा अशीच स्थिती आहे. या ठिकाणी नागरी सुविधा केंद्राचा फलकही नाही. याच ठिकाणी मुद्रांक नोंदणीचे कार्यालय देखील आहे. या दोन्ही केंद्रात नागरिकांची गर्दी झाल्यास उभे राहणेही अशक्‍य होते. कार्यालयात अरुंद जागा असताना या ठिकाणी नागरी सुविधा केंद्र ठेवण्याचा अट्टहास का करण्यात आला? असा सवाल केला जात आहे. नागरी सुविधा केंद्रात करकर्मचाऱ्यांची वानवा कायमच असते. अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर हे कार्यालय चालवले जात असल्याने दाखले मिळण्यासही मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे.

पुरंदर तहसील कार्यालयातील महसुली कामाकरीत येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी महसूल प्रशासनाला पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नाही. पुरंदर तहसील कार्यालयात एका खासगी कंपनीने दिलेला वॉटर फिल्टर “शोपीस’ म्हणून ठेवण्यात आला आहे.

सासवड हे पुरंदर तालुक्‍यातील महसुली कामकाजाचे प्रमुख केंद्र आहे. शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील व न्यायालयीन कामकाजाचा करता येथे यावे लागते. पुरंदरच्या ग्रामीण भागातून येथे येणाऱ्या सामान्य नागरिकांची संख्या मोठी असते. परंतु, पिण्याचे पाणी नाही, बसण्यासाठी बाकडे नाही, स्वच्छतागृह नाही अशा अनेक गैरसोयींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ज्या सरकारी कार्यालयात अशा प्राथमिक सुविधा नाहीत ते तहसील कार्यालय तालुक्‍यातील दुष्काळी आणि पाणी टंचाईच्या प्रश्‍नावर काय उपाय योजना करणार? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. आजच्या नागरी सुविधा केंद्रा समोरील नागरिकांच्या रांगांमुळे आणि एकूणच तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या असुविधेमुळे पुरंदरच्या महसुली प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय…
नागरी सुविधा केंद्रात येणाऱ्या बहुतांशी ज्येष्ठ नागरिकांना उच्च रक्तदाब, मधुमेहाचा त्रास असतोच, यामुळे त्यांना लघुशंकेसाठी वारंवार जावे लागते आणि तहानही वारंवार लागते. परंतु, तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे; त्याचप्रमाणे नागरी सुविधा केंद्र समोर नागरिकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नसल्यामुळे महिलांचीही कुचंबना होत आहे. तालुका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच अशा प्रकारे असुविधा असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here