ससूनच्या धर्तीवर बिबवेवाडीत होणार भव्य रुग्णालय

पुणे – ससूनच्या धर्तीवर आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य रुग्णांसाठी बिबवेवाडीतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या (ईएसआयसी) जागेवर 500 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. दहा एकर जागेत हे रुग्णालय उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 200 बेडच्या इमारत बांधणीचे काम करण्यात येणार आहे. यासाठी 53 कोटींचा निधीही उपलब्ध झाला असून नोव्हेंबर महिन्यात या इमारतीचे भूमीपूजन केले जाणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बिबवेवाडी येथे सर्वसामान्यांना परवडेल असे 500 खाटांचे रुग्णालय उभारण्याची मागणी मिसाळ यांच्याकडून गेल्या आठ वर्षांपासून करण्यात येत आहे. यासंदर्भात 30 जुलै रोजी केंद्रीय कामगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला ईएसआयसीचे डी. जी. राजकुमार, मेडिकल सुपरिटेंडट डॉ. आर. के. कटारीया आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यात 200 आणि पुढील टप्प्यात 300 बेडची इमारती बांधून पूर्ण केली जाणार आहे. रुग्णालय व्यवस्थापनाचे काम ईएसआयसी कॉर्पोरेशनकडे असून डॉक्‍टर उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही त्यांचीच असणार आहे. तसेच याठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या 50 खाटांच्या रुग्णालयाचा लाभ ईएसआयसी कर्मचाऱ्यांना घेता येईल. यानंतर नव्याने सुरू होणाऱ्या या रुग्णालयात सर्व अत्याधुनिक दर्जाच्या सेवा माफक दरात उपलब्ध होणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)