निवडणूकीच्या वादातून सरपंचाच्या पतीचा खून

पुणे – ग्रामपंचायत निवडणूक व जमिनीच्या वादावरून महिला सरपंचाच्या पतीला कारने धडक देऊन गंभीर जखमी करण्यात आले होते. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने रविवारी दुपारी मृत्यू झाला. ही घटना 13 मार्चला पहाटे साडेपाच वाजता आंबेगाव खुर्द येथे घडली होती.

बाळासाहेब सोपान वनशिव (रा. नऱ्हेगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मीनाक्षी बाळासाहेब वनशिव यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. भारती विद्यापीठ पोलिसांनी अविनाश कैलास कांबळे (रा. विठ्ठल कलावती निवास, नऱ्हेगाव) याच्यासह नितीश कैलास थोपटे (रा. धायरी) यांना अटक केली आहे. याप्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत.

फिर्यादी या नऱ्हे गावच्या सरपंच आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वनशिव यांच्याविरुद्ध कांबळे याची पत्नी सरपंचपदासाठी उभी होती. वनशिव यांनी तिचा पराभव केला. त्यावेळी कांबळे याने फिर्यादीच्या पतीला “तुला बघून घेऊ’ अशी धमकी दिली होती. तसेच त्यांच्यामध्ये जमिनीवरूनही वाद होते. दरम्यान, बाळासाहेब वनशिव व त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर पहाटे साडेपाच वाजता मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आंबेगाव बुद्रुक येथे फिरायला गेले होते. त्यावेळी एका कारमधील व्यक्तीने त्यांची रेकी करून त्यांना उडवले होते. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. वनशिव यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा कलमाची वाढ केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)