दिग्दर्शक रितेश बत्रा यांचा आगामी “फोटोग्राफ’ हा चित्रपट खूपच चर्चेत आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा यांची अनोखी जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरजंन करणार आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा एका गुजराती मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे.
मुळ दिल्लीत वाढलेली सान्या ही पंजाबी आहे. पण आपल्या आगामी “फोटोग्राफ’ चित्रपटात गुजराती भूमिका साकारण्यासाठी ती गुजराती भाषा शिकत आहे. आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी सध्या ती गुजराती भाषेचे धडे गिरवीत आहे. यासाठी ती खूप मेहनत घेत असून भाषेचे बारकावे जाणून घेत आहे.
“फोटोग्राफ’मध्ये सान्या मल्होत्रा महत्त्वाची भूमिका साकारत आहे. यापूर्वी ब्लॉकबस्टर “बधाई हो’मध्ये झळकलेली सान्या या चित्रपटात एका अंतर्मुखी महाविद्यालयीन मुलीची भूमिकेत दिसणार आहे. जी अभ्यासात अव्वल असते. तसेच “द लंचबॉक्स’च्या यशानंतर दिग्दर्शक रितेश पुन्हा एकदा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिीकीसोबत काम करत आहे. चित्रपटाचे मुख्य कथानक मुंबईतील धारावीवर आधारित असून तो लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.