तुकारामबीज: संत तुकारामांचे संतमहात्म्य

वैजयंती कुलकर्णी

संतश्रेष्ठ तुकारामांचे सर्व आयुष्य म्हणजे वैराग्याचे एक मंदिरच! तुकारामाच्या गोड अभंगवाणीने आपण पावन होऊन रोमांचित होतो. त्यांच्या आत्मानुभूतीचे बोल अनुभवताना डोळे पाणावले नाहीत अशी व्यक्‍ती सापडणे कठीण. तुकारामांचे परखड शब्द, त्यांची अभंगवाणी, त्यांचा सदाचार, त्यांचे धगधगीत वैराग्य, त्यांची निर्भीडता, नम्रता, वाणीचा गोडवा आणि रसाळता, त्यांचा अभ्यास, त्यांचे मोकळे मन, नमन करण्याची विनयवृत्ती, त्यांच्या शब्दाशब्दांतून पाझरणारा कारुण्याचा झरा, त्यांचे लोण्याहून मऊ अंतःकरण, त्यांचे कीर्तन सामर्थ्य, त्यांची नीती, त्यांचा आत्मप्रत्यय आणि आत्मानुभूती हे सर्वच अनुभवण्यासारखे आहे.

धन्य म्हणवीन इह लोकी लोकां। भाग्य आम्ही तुका देखयेला।। तुकारामांच्या शब्दाशब्दांतून वेदाचे सार, त्याचे सुरस प्रचितीपूर्ण अभंगातून दिसतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूति। देह कष्टविती उपकारें।। आपल्या आचरणांतून चांगला आदर्श संत निर्माण करतात. समाजाला योग्य दिशेने नेण्याचे काम संत करतात. जनसमुद्रातील दीपस्तंभाचे काम ते करतात. आत्मकल्याणाबरोबर, विश्‍वकल्याणही करतात. लोकांना सन्मार्गाला लावणे हेच त्यांच्या जीवनाचे कार्य असते. स्वतः संत तुकाराम महाराज महान संत असूनही ते म्हणतात, मला संताचा दास होण्याची निरंतर आस आहे.

मज दास करी त्यांचा। संतदासांच्या दासांचा।।
तुकारामांचे प्रत्येक वचन, प्रत्येक कृती ही विश्‍वकल्याणार्थच केलेली आहे. त्यांच्या हातून चांगल्या कृतीही सहज घडत. ज्याप्रमाणे आपला सुवास दे, असं कधी चंदनाला सांगावे लागत नाही. सूर्याला तू जगाला प्रकाश दे, असं कधी सांगावं लागत नाही. सारं आपोआप घडत राहते. ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसारच प्रत्येकजण भक्‍तीचे आचरण करतो. तसेच त्याला फळ मिळते. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात.
सांटविले वाण। पैस घातला दुकान।।
जे ज्या पाहिजे जे काळी। ओ सिद्ध चि जवळी।।
निवडिलें सांचें। उत्तम मध्यम कनिष्ठांचे।।
तुका बैसला दुकानी। दावी मोला ऐसीवाणी।।
अधिकार तैसा करू उपदेश।।

हे तुकारामांचे वचन सर्वांना माहीत आहे. प्रत्येक भक्‍ताच्या भक्‍तीप्रमाणेच संत मार्गदर्शन करीत असतात. त्यांना झेपणारं मार्ग सांगतात, दाखवितात. या जगात स्वार्थी प्रेम लगेच होते. ते फक्‍त स्वार्थापुरतेच असते. निर्व्याज प्रेम करणे अवघड असते. ते फक्त संत लोकच करू शकतात. कारण जगाला सुगंध द्यावा हेच फक्‍त झिजणाऱ्या चंदनाला माहीत असते. तुकारामांसारख्या संत विभूती दीनांच्या आप्त होतात, सोयरे होतात आणि सन्मार्गासाठी जगाला भक्‍तीचा राजमार्ग दाखवितात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)