संजय-मुस्तफाने मॉन्सून चॅलेंज जेतेपद राखले

पुणे: पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने महिंद्रा मॉन्सून चॅलेंज विजेतेपद राखले. समान वेळेची पेनल्टी बसूनही टाईम कंट्रोलला सरस कामगिरी नोंदविल्यामुळे संजय गतवर्षी मिळविलेले जेतेपद राखू शकला.

मंगळूर ते दक्षिण गोवा असा मार्ग असलेली सुमारे 650 किलोमीटर अंतराची रॅली नुकतीच पार पडली. ही रॅली टीएसडी (टाईम-स्पीड-डिस्टन्स) स्वरूपाची होती. संजयने नॅव्हिगेटर महंमद मुस्तफा याच्या साथीत ही कामगिरी केली. त्याने महिंद्रा एक्‍सयूव्ही चालविली. शुक्रवारी रात्रीच्या स्टेजपासूनच संजयने आघाडी घेतली होती. के. पी. कार्तिक मारुती-सी. शक्‍तीवेल यांनी दुसरे, तर बी. व्ही. रविंद्र कुमार-एम. सागर यांनी तिसरे स्थान मिळविले.

संजय-मुस्तफा आणि कार्तिक मारुती-शक्‍तीवेल यांना प्रत्येकी एक मिनिट 27 सेकंद अशी समान पेनल्टी बसली. अशावेळी टीएसडी रॅलीच्या स्वरूपातील कामगिरी निर्णायक ठरली. याविषयी संजयने सांगितले की, टीएसडी रॅलीत ठराविक वेळेत ठराविक अंतर पूर्ण करावे लागते. वेळ जास्त किंवा कमी लागला तरी सुद्धा पेनल्टी बसते. दिवसातून साधारण 10 ते 12 टाईम कंट्रोल असतात. ते निर्धारित वेळेत पूर्ण केल्यास झिरो पेनल्टी बसते, जे महत्त्वाचे असते.

यंदा रॅलीचे स्वरूप जास्त खडतर होते आणि स्पर्धक सुद्धा तयारीनिशी आले होते, असे सांगून संजय म्हणाला की, मंगळूरपासून शुक्रवारी एका घाटातून जाऊन परत यायची स्टेज रात्री झाली. ही स्टेज वळणावळणांची होती. त्यात कस लागला. शनिवारी जंगलातून जाणाऱ्या स्टेजमध्ये नॅव्हिगेटर मुस्तफाकडील जीपीएस यंत्र बिघडले. त्यामुळे आम्हाला बरीच पेनल्टी बसली, पण रविवारी आम्ही कामगिरी उंचावली. जागतिक रॅली मालिकेच्या तयारीसाठी मी मायदेशातील फार रॅलींमध्ये सहभागी होऊ शकत नाही. अशावेळी हे यश आनंद देणारे आहे.

मुस्तफा हा अत्यंत मेहनती नॅव्हिगेटर असून तो प्रामाणिक प्रयत्न करतो, असेही संजयने आवर्जून नमूद केले. कर्नाटकमधील किनारपट्टी परिसरातील पश्‍चिम घाट मार्गावरून रॅली गेली. त्या भागात पाऊस आणि दमट हवामान होते. त्यामुळे मॉन्सून चॅलेंजचा थरार स्पर्धकांना लुटता आला, असेही संजयने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)