मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होणार

केंद्र शासनाचा उपक्रम : आशा कार्यकर्ती मार्फत नॅपकीन वाटपाचे केले जातेय नियोजन

नगर -राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी जिल्ह्यात मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेअंतर्गत 1,18,575 सॅनेटरी नॅपकिन पॅकेटचा साठा जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला असून ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या काळात स्वच्छता संवर्धन व्हावे.या उद्देशाने केंद्र शासनाचा मासिक पाळी स्वच्छता संवर्धन कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 10 ते 19 किशोरवयीन मुलींची संख्या मोठी आहे.

आरोग्य विभागाने केले नियोजन
जिल्ह्यातील आरोग्य विभागाला सॅनेटरी नॅपकीनचा साठा उपलब्ध झालेला असून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावनिहाय किशोरवयीन मुलींच्या संख्येनुसार प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला सॅनिटरी नॅपकिन वितरित केलेले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोच केले जाणार आहे यासाठी 10 ते 19 टक्के वयोगटातील किशोरवयीन मुलींची नोंद ग्रामीण भागातील प्रत्येक आशाकडे उपलब्ध राहणार असून प्रत्येक गृहभेटीत याबाबत आशा मार्फत जनजागृती करून माहिती दिली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हा उपक्रम अहमदनगर जिल्ह्यामध्ये राबविला जाणार आहे तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजना राबविण्याचे नियोजन केलेले असून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून गाव पातळीवरील किशोरवयीन मुलींपर्यंत ही योजना राबविली जाणार आहे

मासिक पाळी सुरू होण्याचे वय 10 ते 16 वर्षांपर्यंत असू शकते .किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक ,मानसिक ,भावनिक, बदल होतात त्यात मासिक पाळी सुरू होणे हा महत्त्वाचा टप्पा आहे.त्यात योग्य माहितीच्या अभावी मुलींना मासिक पाळी सुरू झाल्यानंतर नैराश्‍य येणे, उदासीनता येणे,शारीरिक अस्वच्छता व त्या बाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत असलेल्या अज्ञानामुळे आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागामध्ये अज्ञानाच्या कारणाने किशोरवयीन मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तसेच या काळात स्वच्छता न ठेवल्याने आजारांनाही सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील मुलींसाठी माफक दरात सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

या धोरणानुसार अहमदनगर जिल्ह्यात दरमहा ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन आशा कार्यकर्ती मार्फत माफक दरात वितरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.अहमदनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील 10 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन हे सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

तसेच मासिक पाळीच्या काळात आरोग्याची काय काळजी घ्यावी व स्वच्छता कशी ठेवावी,या विषयाची जनजागृती ग्रामीण भागांमध्ये आशा स्वयंसेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत केली जाणार आहे.याबाबतचे प्रशिक्षण आशा स्वयंसेविका यांना देण्यात आलेले आहे.

मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाला 1,19,575 सॅनिटरी नॅपकीन पॅकेटचा साठा उपलब्ध झालेला आहे.एप्रिल पासून प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व किशोरवयीन मुलींना आशा स्वयंसेविकांमार्फत माफक दरात सॅनिटरी नॅपकीन वाटप सुरू करण्यात आले आहे.

तसेच ग्रामीण भागातील सर्व किशोरवयीन मुलींनी मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व उपाध्यक्षा राजश्रीताई घुले , मुख्य कार्यकारी अधिकारी ,विश्‍वजित माने यांनी केलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.