सांगली मतदारसंघ आणि वसंतदादा घराणे

सांगली मतदारसंघाला वसंतदादा पाटील यांच्या घराण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे 1970 आणि 80 च्या दशकात राजकारणातील प्रभावी व्यक्‍तिमत्त्व म्हणून परिचित होते. पाटबंधारे मंत्री, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशी जबाबदारी संभाळलेल्या वसंतदादांना 1977 मध्ये आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात कॉंग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली. 1980 मध्ये वसंतदादा सांगली मतदारसंघातून इंदिरा कॉंग्रेसतर्फे लोकसभेवर निवडून गेले. तेव्हापासून सांगली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व वसंतदादांच्या घराण्यातील व्यक्‍तीनेच केले आहे. 1983 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर वसंतदादांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी 1983 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील निवडून आल्या. 1984 निवडणुकीत दादांचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी दिली गेली. 84, 89, 91 अशी सलग बारा वर्षे प्रकाशबापूंनी लोकसभेत सांगलीचे प्रतिनिधित्व केले.

1995 च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाशबापूंनी विधानसभेची उमेदवारी मागून घेतली होती. त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू विष्णूअण्णा पाटील यांचे चिरंजीव मदन पाटील यांनी बंडखोरी केली. मदन आणि प्रकाशबापू दोघेही विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. 1996 मध्ये प्रकाशबापूंना लोकसभेची उमेदवारी नाकारली गेली. प्रकाशबापूंनी खासदारकी आपल्या घराबाहेर जाऊ नये यासाठी मदन पाटील यांचे नाव सुचवले. त्या प्रमाणे मदन पाटील यांनी 1996,98 अशा दोन निवडणुकीत सांगलीमधून विजय मिळवला. 1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर मदन पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. 99 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे प्रकाशबापू, राष्ट्रवादीतर्फे मदन पाटील आणि भाजपतर्फे अण्णा डांगे यांचे पुत्र चिमण डांगे अशी तिरंगी लढत झाली. या लढतीत प्रकाशबापू पाटील यांनी मदन पाटील यांचा 1,60,560 एवढ्या दणदणीत मतांनी पराभव केला. 2004 मध्ये पुन्हा प्रकाशबापूंना कॉंग्रेसतर्फे उमेदवारी मिळाली.

भारतीय जनता पक्षा तर्फे दीपक शिंदे म्हैसाळकर यांना उमेदवारी दिली गेली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागनाथअण्णा नायकवडी यांनी ही अपक्ष म्हणून रिंगणात उडी मारली होती. या लढतीत प्रकाशबापूंनी 81,623 मतांनी विजय मिळवला. प्रकाशबापूंना 3,05,048 तर दीपक शिंदे यांना 2,23,425 एवढी मते मिळाली. अपक्ष नागनाथअण्णा नायकवडी यांना 1,37,122 मते मिळाली. प्रकाशबापूंचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणुकीत त्यांचे चिरंजीव म्हणजे वसंतदादांचे नातू प्रतिक पाटील यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली गेली. त्यांच्या विरोधात भाजपतर्फे पुन्हा दीपक शिंदे मैदानात उतरले. तर पतंगराव कदम यांचे खंदे समर्थक माजी आमदार दिनकर पाटील हे बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. पतंगराव यांच्या समर्थकांनी दिनकर पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली. दीपक शिंदे यांनाही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एक वजनदार मंत्र्याच्या समर्थकांचा आतूूून पाठिंबा होता. भारतीय जनता पक्षानेही या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

दिनकर पाटलांच्या बंडखोरीमुळे कॉंग्रेसच्या मतात विभाजन होऊन त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा होईल असे चित्र निर्माण झाले होते. तरीही वसंतदादांच्या पुण्याईमुळे प्रतिक पाटलांनी या निवडणुकीत बाजी मारली. 2009 च्या निवडणुकीवेळी सांगली जिल्ह्यातील राजकीय स्थितीत बरेच बदल घडले होते. राष्ट्रवादीचे वजनदार नेते आणि त्यावेळचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगली महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या समर्थकांची आघाडी तयार केली होती. या आघाडीमध्ये भाजप-शिवसेनेलाही सहभागी करून घेण्यात आले होते. या आघाडीने कॉंग्रेसचा पराभव करत महापालिकेची सत्ता मिळवली होती. त्यामुळे सांगली शहराच्या राजकारणात जयंत पाटील यांचे वर्चस्व निर्माण झाले होते. जयंत पाटील यांनी प्रतिक पाटील यांना पराभूत करण्याच्या उद्देशाने आपले समर्थक अजित घोरपडे यांना प्रतीक पाटलांच्या विरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरवले. जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे अजित घोरपडे यांना भाजप-शिवसेनेने पाठिंबा दिला. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणाऱ्या बहुतांश नेते मंडळींनी अजितराव घोरपडे यांच्यामागे आपली ताकद उभी केली.

एकास एक लढत असल्यामुळे प्रतीक पाटील पराभूत होणार असे वातावरण निर्माण केले गेले. मात्र यावेळीही प्रतीक पाटलांना वसंतदादांच्या पुण्याईने हात दिला. प्रतीक पाटील हे या वेळी विजयी झाले मात्र त्यांचे मताधिक्‍य लक्षणीयरित्या घटले. प्रतिक पाटील यांना 3,78,620 तर घोरपडे यांना 3,38,838 मते मिळाली. 2014 मध्ये प्रतिक पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले संजयकाका पाटील यांच्यात लढत झाली. मात्र या निवडणुकीत ते पराभूत झाले आणि घराणेशाहीची ही परंपरा खंडित झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)