महामार्ग पोलिसांच्या कर्तव्यावर झाले प्रश्‍नचिन्ह निर्माण

पोलिसांच्या गणवेश अन्‌ नेमप्लेट नसल्याचा व्हिडीओ झाला व्हायलर

संगमनेर – संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या महामार्ग पोलिसांचा गणवेश, नेमप्लेट व त्यांची कर्तव्ये याचा दणदणीत जाब विचारणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर शनिवारी सकाळपासून धुमाकुळ घालत आहे.

-Ads-

शुक्रवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास बोटा गावाजवळ महामार्ग पोलिसांच्या वाहनाजवळ एक मोटार कार येवून थांबली. तिच्यातून उतरलेल्या निळसर रंगाचा नेहरु परिधान केलेल्या एका पुढारीवजा व्यक्‍तीने थेट पोलिसांजवळ जावून, तुमच्या गणवेशावरील नेमप्लेट कुठे आहे, अशी विचारणा केली. यावेळी पाच पोलीस कर्मचारी व एक उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी होते. दोन तीन पोलिसांना नेमप्लेट नसल्याबद्दल विचारणा करतानाच, कार्य व कर्तव्ये याची प्रत आहे का, तुमच्या चालकाला नियमाप्रमाणे खाकी गणवेश का नाही, अशा प्रकारच्या प्रश्‍नांची सरबत्तीच केल्यानंतर उपनिरीक्षकांनी याबद्दल सारवासारव केली. या सर्व घटनेचे त्यांचे सहकारी मोबाईलवर चित्रीकरण करीत होते.

या दरम्यान या व्यक्‍तीचे नाव समजले नसले तरी ही व्यक्‍ती अखिल भारतीय वाहतूक संघटनेचे अध्यक्ष असल्याची माहिती चित्रीकरणात समजते. अनेकांना कधी ना कधी नडलेल्या वाहतूक पोलिसांनाही कोणीतरी नडल्याचा हा व्हिडीओ प्रतिक्रियांसह अतिशय वेगाने सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

संगमनेर तालुक्‍यातील पुणे नाशिक महामार्गावरील डोळासणे चौकीत सतरा पोलीस कर्मचारी व उपनिरीक्षक दर्जाचा एक अधिकारी नेमणुकीस आहे. पूर्व पश्‍चिम संगमनेर तालुक्‍यातील वडगावपान टोलनाका ते अकोले तालुक्‍याच्या सरहद्दीवरील इगतपुरी (जि.ठाणे) पर्यंतचा सुमारे 80 किलोमिटरचा रस्ता तसेच दक्षिणोत्तर आळेखिंड ते कऱ्हेघाट या सुमारे 50 किलोमीटरचा रस्ता या चौकीच्या कार्यक्षेत्रात आहे. या मार्गावरील रस्ते सुरक्षा, छोटे मोठे अपघात, वाहतुक नियमांचे उल्लंघन यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या चौकीवर आहे.

मात्र इंग्रजी भाषेत एचपीएस (हायवे पोलीस) असे लिहिलेला तांबड्या रंगाचा बॅंड उजव्या हाताच्या दंडावर बांधणे आवश्‍यक असताना, अनेकदा तो वापरला जात नाही. तर मध्यंतरी मुंबई येथे झालेल्या प्रशिक्षणा दरम्यान सांगितल्याप्रमाणे वाहतूक पोलीस वाहनाच्या चालकांना खाकी ऐवजी पांढऱ्या रंगाचा शर्ट वापरला तरी चालतो अशी माहिती एका पोलिसाने दिली.

सोशल मिडीयावर “व्हाईरल’ झालेला व्हिडीओ खरा असून आम्हाला वाटले आमदार साहेब आहेत. बाकीच्यांना वाटले लाचलुचपत विभागातील कर्मचारी आहेत. संबंधित व्यक्‍ती कोण होत्या. अद्याप समजू शकले नाही. मात्र आम्ही नेमप्लेट लावल्या नाही हि आमची चुकी होती. – अनिल औटी पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग पोलीस डोळसणे.

पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटाजवळ स्त्याच्या कडेला उभं राहून वाहने थांबवून चालकाची कागदपत्रांच्या बदल्यात रोकड रक्कम घेतली जाते. जनतेचे पहारेकरीच अवैध रूपानं नागरिकांचे पैसे लुटत असल्याने पोलिसांची वर्दी मलिन होत चालली आहे. आता या “व्हाईरल’ व्हिडीओवर वरिष्ठ काय पाऊल उचलतात याकड़े आमचे लक्ष लागून राहिले आहे.
– रऊफ शेख तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग संगमनेर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)