कांद्याला एक रुपया 11 पैसे किलोला भाव

656 किलो कांद्याचे मिळाले फक्त 50 रुपये : हेच का अच्छे दिन शेतकऱ्यांकडून सवाल

संगमनेर : अच्छे दिनचे गाजर दाखवून भाजप सत्तेवर आला. मात्र, सत्तेवर येऊनही शेतकऱ्यांच्या नशिबी अच्छे दिन तर सोडाच. परंतु त्याचे मुळचे दिनही राहिले नाहीत. संगमनेर तालुक्‍यातील सिद्धू घुले या शेतकऱ्याला त्याचा पुरेपूर अनुभव आला. या शेतकऱ्याने तब्बल 653 किलो कांदा संगमनेर बाजार समितीत विकला. त्यास एक रुपया 11 पैसे किलो भाव मिळाला. तसेच हमाली, तोलाई, असे धरून त्यांच्या हाती केवळ 50 रुपये मिळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे हेच का ते अच्छे दिन, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे.

सिद्धू घुले हे संगमनेर तालुक्‍यातील सावरगाव घुले येथील शेतकरी. भयान दुष्काळी स्थितीतही अपार मेहनत घेत त्यांनी आपल्या शेतात कांदा पिकवला. मात्र, हा कांदा बाजारात विकल्यावर त्यांना केवळ 50 रुपयाचा फायदा झाला. त्यामुळे भांडवलदार धार्जिण्या बाजारपेठा यांच्या कचाट्यात आडकलेल्या शेतकऱ्यावर काय वेळ येऊ शकते, हे यानिमित्ताने पुढे आले आहे.

“मी मोठ्या आशेने 11 गोण्या कांदा विक्रीसाठी संगमनेर बाजार समितीत आणला 1 नंबर कांद्याला 200 रुपये, 2 नंबर कांद्याला 100 रुपये दर मिळाला कांदा लागवड, कापणी, खुरपणी, औषध फवारणी आदी खर्च धरला, तर तो हजारो रुपयांत जातो अन्‌ कांद्याला भाव मिळतो, तो शेकड्यात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्‍न निर्माण झालाय.
– सिध्दू घुले, शेतकरी, सावरगाव घुले

आधीच दुष्काळाचे सावट आहे. कांदाच भविष्यात थोडाफार आर्थिक आधार देईल, अशी अपेक्षा असताना व पाऊस न आल्याने विहिरी आटू लागल्या आहेत. नवीन कांदा उत्पादन येईल याची शक्‍यता आता संपुष्टात आली आहे. तेव्हा आहे तो कांदा ही भावात घसरण झाल्याने मातीमोल भावात विकावा लागत आहे. दुष्काळाचे सावट घर करू लागल्याने पुढील पावसाळा येई पर्यंत पिण्याचे पाणी व जनावरांना चारा कसा मिळेल, याची ही चिंता वाढली आहे.

संगमनेर बाजार समितीतील हरी ओम ट्रेडर्स या आडतदाराकडे घुले यांनी कांदा विक्रीसाठी पाठविला होता. त्याचे दोन वेगवेगळे बक्कल होते. त्याचे एकूण वजन 653 किलो इतके भरले. त्यापैकी 221 किलो कांद्याला प्रतिकिलोस 2 रुपये इतका दर मिळाला, तर त्यापैकी 432 किलो कांद्याला प्रतिकिलोस 1 रुपया 11 पैसे इतका दर मिळाला. एकूण रक्कम 921 रुपये 50 पैसे इतकी झाली. त्यातून हमाली 34 रुपये 40 पैसे, तोलाई 25 रुपये, वाराई 12 रुपये, तर मोटार भाडे 800 रुपये, एवढा बाजार खर्च पट्टीतून वजा करून शेतकऱ्याच्या हाती फक्त 50 रुपये 10 पैसे उरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)