संगमनेर बाजार समितीसमोर कांदा ओतून निषेध

कांद्याला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त

संगमनेर – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज लाल कांद्याला केवळ शंभर रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान बाजार समिती गेट समोरील पुणे नाशिक महामार्गावर विक्रीसाठी आणलेल्या कांद्याच्या पंचवीस गोण्या रस्त्यावर ओतून, निषेध व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्‍यातील गणोरे येथील भाऊ आंबरे, गणेश आंबरे, मंगेश आंबरे व प्रवीण आंबरे यांनी आपला कांदा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला असता, त्यांच्या लाल कांद्याला मात्र शंभर रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. यावेळी गोणी, गाडीभाडे, हमाली व तोलाईचा खर्च मिळवला असता कांद्याला 140 रुपये प्रति क्विंटल इतका खर्च आला असताना, बाजारात त्या कांद्याला 100 रुपये भाव मिळाल्याने संतप्त आंबरे बंधूंनी आपला कांदा रस्त्यात ओतून देण्याचा निर्णय घेतला. यावेळी जवळपास 20 ते 25 कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून देत आपला निषेध व्यक्त केला.

दरम्यान मागील आठवड्यात याच कांद्याला 400 ते 600 रुपये प्रति क्विंटल दर दिला गेला होता. संगमनेरचे तहसीलदार साहेबराव सोनावणे व शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रजपूत व त्यांचे सहकारी यावेळी काही वेळातच घटनास्थळी होऊन शेतकऱ्यांना शांत करत परिस्थिती आटोक्‍यात आणली.

आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली. यावेळी बाजार समितीतील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील कांदा साफ केला. त्याचबरोबर नगरपरिषदेकडून अग्निशमन दलाचे पाचारण करून घटनास्थळी स्वच्छता करण्यात आली. काढणीनंतर पाच ते सहा महिने साठवूनही दोन पैसे मिळण्याऐवजी नुकसानीत त्याची विक्री करावी लागत असल्याने, शेतकरीवर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)