फ्लिकर सिंग ऑफ इंडिया – संदीप सिंग

आयुष्य समोर जीवनाचा अपेक्षित प्रवास घेऊन उभे असताना असे काही घडावे की, अपेक्षित काय अन अनपेक्षित काय यातील माणसाला फरकच करता येऊ नये. संदीप सिंग हे भारतीय हॉकी क्षेत्रातील एक मोठे नांव. त्यांच्या आयुष्यातही असेच काहीतरी घडले होते. हरियाणामधील शहाबाद या छोट्याशा शहरापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज संपूर्ण देशासाठी आदर्शवत बनला आहे. संदीप सिंग ते फ्लिकर सिंग ऑफ इंडिया हा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर अशा मार्गावरून मार्गक्रमण करीत अपेक्षित उंचीवर जाऊन पोहचला. यासाठी त्यांना आयुष्यातील भरपूर वेळ खर्च करावा लागला.

आपला मोठा भाऊ हॉकी खेळतोय म्हणून त्याला चांगले कपडे, शूज, मिळतात तर मलाही ते मिळतील या विचारातून संदीप यांच्या हॉकीच्या प्रवासाची सुरूवात झाली. हॉकी आवडायची मात्र खेळण्याची इच्छा त्यांची कधी झाली नव्हती. मग कपडे मिळतील, हॉकीची स्टिक आपल्यालाही मिळेल म्हणून त्यांनी हॉकीचा श्रीगणेशा केला. अत्यंत कडक शिस्तीच्या प्रशिक्षकाकडे हॉकीचे प्रशिक्षण चालू झाले. प्रशिक्षक म्हणजे एका साध्या चुकीसाठीही चार-चार दिवस शिक्षा देणारा माणूस. आपल्या देशाच्या हॉकीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी संदीप यांनी कठोर मेहनत घेत तयारी चालू केली. धनराज पिल्ले यांना आदर्श मानत आपणही काहीतरी योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी मनोमन ठरविले होते. 2003 मध्ये ते एक तरुण खेळाडू म्हणून भारतीय संघात सहभागी झाले. 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ते खेळले. 2005 मध्ये ज्युनियर वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सर्वाधिक गोल बनविले. कमी वेळेमध्ये ते आपली ओळख बनवू शकले.

-Ads-

खूप चांगल्या प्रकारे सगळे चालू असते. मात्र, 21 ऑगस्ट 2006 रोजी घडलेल्या एका घटनेमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. संदीप सिंग शताब्दी एक्‍सप्रेसने दिल्लीला निघाले होते. ज्या सीटवर ते बसले होते, त्यांच्या पाठीमागच्या सीटवर एक आरपीएफचा सैनिक बसला होता. त्या सैनिकाकडून चुकीने गोळी चालली आणि ती गोळी थेट संदीप सिंग यांना लागली. तेथून त्यांना चंडीगड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तीन-चार आठवड्यानंतर त्यांना शुद्ध आली. त्यावेळी ते व्हेंटीलेटर वरती होते. वर्ल्डकप खेळण्यासाठी निघालेल्या संदीप यांच्या शरीराचा अर्धा भाग असून नसल्यासारखा झाला होता. डॉक्‍टरांनी त्यांना सांगितले कि, तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून वाचलात. पण तुम्ही कधी हॉकी खेळाल असे आम्हाला वाटत नाही. तुम्ही व्हीलचेयर बसू शकलात तरी खूप झाले. अशावेळीही आपल्यातील खेळाडू जागृत ठेवून संदीप यांनी सर्वांना सांगितले कि, मला माझ्या आजूबाजूला एकही नकारात्मक व्यक्ती नको आहे. भावाला ते म्हणाले की, मला माझी हॉकी स्टिक आणून द्या. आपल्याला पाय आहेत की नाहीत याची काहीही जाणीव नसतानाही मला हॉकी खेळायची आहे, मला भारतासाठी खेळायचे आहे. हे स्वप्न त्या दवाखान्यातील बेडवर पडून संदीप सिंग पाहत होते. खूप प्रयत्नांनी काही महिन्यांनतर ते व्हीलचेयर बसू शकले.

पुनर्वसन केंद्रात दाखल होण्यासाठी विदेशात जाताना संदीप व्हीलचेयर वरती गेले मात्र, काही महिन्यांनी ते स्वतः च्या पायावर चालत भारतात दाखल झाले. आता एकच ध्येय होते ते म्हणजे भारतीय संघात दाखल व्हायचे. तयारी पुन्हा चालू केली. खूप मेहनत घेतली, सराव सामने खेळले तरी एक प्रश्न राहायचा कि, संदीप सिंग फिट नाहीयेत..! 2008 मध्ये फेडरेशनने त्यांना संधी दिली. त्यांनी त्या संधीचे सोने केले. 145 कि.मी.प्रती तास ड्रेगफ्लिक करण्याचा संदीप यांचा जागतिक विक्रम आजही अबाधित आहे. सगळे संपले असतानाही पुन्हा Come Back करणे आणि भारतीय संघाचा कर्णधार बनणे हे सोपे नव्हते. अर्जुन पुरस्कार मिळविणारे संदीप सिंग हे एक आदर्श खेळाडू आहेत. आव्हाने स्वीकारून Never give up हा दृष्टीकोन ठेवत आयुष्य जगले पाहिजे, हेच आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळते. संदीप यांच्या आयुष्यावरील सुरमा हा चित्रपट आताच प्रदर्शित झाला आहे. जिंदगी में मुश्‍किल कुछ भी नहीं होता… असे म्हणत ते संघर्ष करीत राहिले, म्हणूनच आज ते अपेक्षित उंचीवर पोहचू शकले.

– श्रीकांत येरूळे

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)