नवी दिल्ली – बिनधास्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेले माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज विधान केले आहे. यावेळी सिद्धू यांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना लक्ष करताना त्यांची तुलना थेट पावसाळ्यातील बेडकाशी केली आहे. संबित पात्रा हे पावसाळी बेडूकासारखे आहेत. पाऊस येताच ते डरॉव डरॉव करत असतात, असा टोला सिद्धू यांनी लगावला आहे.
सिद्धू यांनी एका सभेमध्ये बोलताना भाजपच्या दिग्गज नेत्यांवर आपल्या खास शैलित टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाना साधला. या सभेतील एक व्हिडीओ क्लीप सिद्धू यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी “काळे इंग्रज’ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
त्यावर संबित पात्रा यांनी प्रत्तुत्यर देत मोदी जर “काळे इंग्रज’ आहेत, तर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी या भारतीय आहेत का?, संबित पात्रा यांच्या या प्रश्नाचा समाचार घेणारे ट्विट सिद्धू यांनी केले आहे. यामध्ये ते म्हणत आहेत, पावसाळी बेडूक जेव्हा डरॉव डरॉव करत असतो. अशावेळी कोकीळ नेहमीच शांत राहते. आणि कोणी कितीही किंकाळ्या फोडल्या तरी हत्तीही त्याच्या चालीने चालत राहतो, असे म्हटले आहे.