सालपेत वृद्ध महिलेचा निर्घृण खून

धारदार शस्त्राने केले वार, परिसरात खळबळ

लोणंद – सालपे गावातील शांताबाईं जयवंत खरात (वय 70) या महिलेचा सोमवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पाठीवर वार करून निर्घृण खून केला. या घटनेमुळे सालपेसह परिसरात खळबळ उडाली आहे. शांताबाई या लघुशंका करण्यासाठी घराबाहेर आल्या असताना ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

शांताबाई खरात या कुटुंबियांसमवेत सालपे येथे वास्तव्यास आहेत. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्या लघुशंकेसाठी घराबाहेर आल्या होत्या. बराचवेळ झाला तरी त्या पुन्हा घरात आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे पती जयवंत खरात हे घरातून बाहेर आले. यावेळी शांताबाई रस्ताच्या थारोळ्यात पडल्या असल्याचे त्यांना दिसले. अज्ञातांनी शांताबाई यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अचानक घडलेल्या या घटनेमुळे जयवंत खरात यांनी आराडाओरडा केल्या. त्यामुळे आजुबाजुचे लोक गोळा झाले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शांताबाई यांना तात्काळ लोणंद येथील प्राथामिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, घटनास्थळावरी उपस्थितांनी तात्काळ घटनेची माहिती लोणंद पोलिसांनी दिली. माहिती मिळताच लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरिश दिघावकर आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी पोहोचले.

अधिक तपासासाठी सातारा येथून ठसेतज्ञांसह श्‍वानास पाचारण करण्यात आले. मात्र श्‍वान परिसरात घुटमळले. घटनेचे गांभीर्य ओळखून फलटण पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक अभिजीत पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. याप्रकरणी संतोष जयवंत खरात यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. लोणंद पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सपोनि गिरिश दिघावकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)