#Video : सोमेश्वरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बाल वारकरी झाले विठूमय…

पुणे – बारामती ता. सोमेश्वरनगर परिसरात करंजे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत सोपनकाका महाराज दिंडी व पालखी सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शाळेमधील चिमुलकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त भाग घेतला.

दिंडी सोहळ्यास गावातील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले, तसेच या पालखी सोहळ्याचे महिलांनी फुल-आरती ओवाळत मनोभावे दर्शन घेतले. टाळ-मृदुंग, तुकारामाचे नमन, ज्ञानेश्वर महाराज यांचा जयघोष, “पंढरपुरी चला रे पंढरपुरी चला” “तुकोबा रुखमाई तुकोबा रुखमाई” असे म्हणत संपूर्ण परिसरातून ही दिंडी मार्गस्थ झाली. वारकरी व संत-महात्म्यांच्या वेशभूषेतील बालकांच्या खांद्यावर छोटेखानी पालख्या, हातात टाळ व भगवे ध्वज व मुखातून सुरू असलेल्या विठ्ठलाच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले.

बालक स्वरुपातील विठोबा व रुक्मिणी, डोक्यावर मंगल कलश व तुळस घेतलेल्या नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली तसेच धोतर-टोपी-पांढरा शर्ट, कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेतलेल्या मुलांची ही दिंडी लक्ष वेधून घेत होती. इब्राम याकूब शेख या विद्यार्थ्यांने विठ्ठलाची वेशभूषा केली होती तर मृणाल विरसेन हुंबरे हिने रूक्मिणीची वेशभूषा केली होती. ग्रामस्थांनी दिंडीत दर्शनाचा आनंदही घेतला व सरपंच जया संताजी गायकवाड यांनी चालू वर्षी चांगला पाऊस पडावा अशी मनोभावी पुजा करत सर्वांचे कौतुक केले.

मुख्याध्यापक दिलीप बालगुडे, सहशिक्षक भारती गायकवाड, मंगल गायकवाड, मार्गदर्शनाखाली ही दिंडी काढण्यात आली होती. अरविंद भगत व तंटामुक्ती अध्यक्ष विकास भंडलकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना बिस्कीट व पेन वाटप करण्यात आले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)