सैफची स्तुतिसुमने, करिना अवाक्‌!

नथिंग सक्‍सीडस्‌ दॅन सक्‍सेस म्हणजेच यशापेक्षा मोठं काहीही नसतं असं म्हटलं जातं. या सुवचनाची चर्चा नव्याने झाली ती अभिषेक कपूर दिग्दर्शित “केदारनाथ’ आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित “सिंबा’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षरशः कोट्यवधी लोक सारा अली खानचे दिवाने झाले आहेत. सारा ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची कन्या आणि शर्मिला टागोर यांची नात आहे. अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफ अली खानने करिना कपूरसोबत विवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केली. अमृताने मात्र सारा आणि मुलगा इब्राहिम यांच्या पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी सिंगल मदर म्हणून पार पाडली. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

जवळपास 120 किलो वजनाची सारा कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पदवी संपादित करून भारतात परतली तेव्हा तिने आपल्या आईकडे सिनेसृष्टीत नायिका म्हणून झळकण्याची इच्छा व्यक्‍त केली. अमृताने तिला पूर्ण पाठिंबा दिला. सर्वप्रथम तिचे वजन कमी करण्यावर भर दिला. तिचे ग्रूमिंग करतानाच तिला अभिनयाचे बाळकडू आणि धडे दिले. सारा जेव्हा पहिल्यांदा पडद्यावर झळकली तेव्हा तिने आपल्या सौंदर्याने, ग्लॅमरने, टॅलेंटने, हिंदी-उर्दू या भाषांवरील आपल्या पकडीने आणि एकंदरीतच टॅलेंटने सर्वांचीच मने जिंकली. अर्थातच याचे सर्व श्रेय अमृता सिंहला जाते. कारण सैफने अमृताशी वेगळे झाल्यानंतर मुलांच्या जडणघडणीत कोणतीच भूमिका पार पाडलेली नाही. त्यामुळेच आता खुद्द सैफ अली खान साराच्या यशाचे श्रेय उघडपणाने अमृताला देत तिचे गुणगान गाताना दिसत आहे. मात्र सैफच्या या अमृतावरील स्तुतिसुमनांच्या उधळणीने करिना कपूरची झोप उडाली आहे म्हणे !

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)