कहे कबीर : मनाच्या मते चालू नये   

अरुण गोखले 

मन के मते ना चलिये, 
मन के मते अनेक। 
जो मन पर अस्वार हैं, 
सो साधू कोई एक ।। 

-Ads-

नको मनाच्या मते चालू रे, 
मते मनाची बहु असती। 
मन वारूवर स्वार न होई, 
साधू संत त्यासी म्हणती।। 

भावार्थ – अगर नर करनी करे तो नरका नारायण बन जाए। हे जरी स्वत: कबीरांचे वचन असले तरी नराने नारायण व्हायचे का आणखी अधोगतीला जायचे हे ज्याचे त्याचे मनच ठरवित असते. कोणतीही गोष्ट मनाने मनावर घेतल्याशिवाय होत नाही. मन चंचल आणि अस्थिर आहे. ते क्षणोक्षणी बदलत असते. मन माणसाला एखाद्या घोड्यावर स्वार असलेल्या व्यक्‍तीसारखे फिरवत असते. त्यामुळेच कबीरजी ह्या दोह्यातून माणसाला फार मोलाचा सल्ला देतात. ते म्हणतात, की बाबा रे, तू मनाच्या मताप्रमाणे बेताल वागू नकोस. ते नेईल तिकडे जाऊ नकोस. कारण मनाची मते ही अनेक असतात. ती सतत बदलत असतात. मानवी मन हे कधीच एके ठाई स्थिर राहात नाही. एखाद्या उनाड वासरासारखे ते चौफेर हुंदडत असते.

मनाच्या इच्छेप्रमाणे आपण न वागता मनाला वेळीच संयमाचा लगाम घातला पाहिजे. त्याला स्वच्छंदी, मोकळे सोडता कामा नये. कारण चंचल मनाला चांगल्या वाईटाचा, भल्या बुऱ्याचा विवेक राहात नाही. ते नको त्या गोष्टींना भुलते. तुम्हालाही भुलवते आणि आत्मकल्याण नाही तर आत्मनाशाकडे घेऊन जाते.

इथे संत कबीर जीवनाबाबत खऱ्या अर्थाने सावध असलेल्या लोकांबद्दल सांगतात. ते म्हणतात की जे मनावर स्वार नाहीत, तर ज्यांनी मनाच्या वारूला स्वत:च्या ताब्यात ठेवले आहे, ज्यांचा स्वत:च्या मनावर ताबा आहे, जे मनाच्या तालावर नाही तर स्वत:च्या इच्छेने मनाला आत्म कल्याणाच्या सद्‌मार्गावर घेऊन जातात, त्यांनाच साधू किंवा संत असे म्हणतात. मन जिंकी तो जग जिंकी हे विसरता कामा नये. मनाने आपल्यावर नाही तर आपण मनावर स्वार व्हायला हवे, आणि मनोजयी व्हायला हवे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)