फडणवीस सरकारला साईबाबा पावले

शिर्डी देवस्थान ट्रस्टकडून बिनव्याजी 500 कोटींचे कर्ज

अहमदनगर: अहमदनगर जिलह्यातील निळवंडे येथील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी शिर्डी देवस्थान संस्थान ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी शिर्डीच्या ट्रस्टने 500 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज सरकारला दिले आहे. या योजनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्‍यांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारला सिंचन योजनेसाठी शिर्डी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि भाजपा नेते सुरेश हावरे यांनी कर्ज मागितल्यानंतर परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे सरकारला इतक्‍या मोठ्या प्रमाणावर कोणत्याही देवस्थानने यापूर्वी बिनव्याजी कर्ज दिले नव्हते. इतकेच नव्हे तर या कर्जाच्या परतफेडीसाठी कोणताही कालावधी निश्‍चित करण्यात आलेला नाही. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका बैठकीद्वारे या कर्जाचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर शनिवारी (दि.1) कर्जाची रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले.

-Ads-

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, साईबाबा मंदिर ट्रस्ट आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळाने यासाठी सहमती पत्रावर सह्या केल्या आहेत. निळवंडे सिंचन प्रकल्प बऱ्याच काळापासून रखडला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 1200 कोटी रुपये आहे. त्यासाठी मंदिर ट्रस्ट 500 कोटी रुपये देणार आहे. या प्रकल्पासाठी जलसिंचन विभागाकडून यंदाच्या बजेटमध्ये 300 कोटींची तरतूद केली आहे. तर पुढील वर्षासाठी 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, दोन वर्षात या प्रकल्पातील कालव्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची आशा आहे. गेल्यावर्षीही मंदिर ट्रस्टने या प्रकल्पासाठी 500 कोटी रुपये सरकारला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या कर्जाचा कालावधी निश्‍चित करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोला, संगमनेर, राहुलरी, कोपगाव आणि शिर्डी या गावांना फायदा होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)