साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

मराठी साहित्य संमेलन वाद प्रकरण

यवतमाळ: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे. पण साहित्य संमेलन होईपर्यंत यावर निर्णय होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. उद्याच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल. आता महामंडळाच्या उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्‍यता आहे.

नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची प्रेरणा मला राज ठाकरे यांच्याकडून मिळाली. हा वाद मनसेच्या एका कार्यकर्त्याने संमेलन उधळण्याची धमकी दिल्याने सुरू झाला होता. त्या कार्यकर्त्याचे कृत्य आपल्या अंगावर घेऊन राज यांनी माफी मागितली. मनाचा मोठेपणा दाखविला. मी देखील तसेच केले आहे.
श्रीपाद जोशी

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले होते. त्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा गदारोळ माजला आहे. आयोजकांकडून सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे साहित्यिकांसह अनेक क्षेत्रातल्या लोकांनी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.

निमंत्रण रद्द करण्याआधी श्रीपाद जोशी यांनी साहित्यिकांशी चर्चा केली पाहिजे होती, अशा शब्दात काही साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली होती. जोशींच्या या निर्णयामुळे महामंडळाचे इतर सदस्य निष्कारण टीकेचे धनी ठरत आहेत, असेही काही साहित्यिकांनी म्हटले होते.

या वादानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आज महामंडळ उपाध्यक्ष विद्या देवधर यांना ई-मेलने राजीनामा पाठवला. मात्र साहित्य संमेलन होईपर्यंत राजीनाम्यावर निर्णय होणार नाही, अशी माहिती मिळत आहे. यासंबंधी उद्या बैठक होणार असून त्यानंतर याबाबत निर्णय होईल.

येत्या 11 जानेवारीपासून यवतमाळ येथे 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संमेलनाची सुरुवात वादाने झाली आहे. विशेष म्हणजे श्रीपाद जोशी यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पुढील 3 महिन्यात संपणार होता. अशात साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)