रानमांजर असल्याचा वनखात्याचा दावा
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर नागरिकांना दिसलेला “तो’ प्राणी रानमांजर असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे स्पष्ट केले. बिबट्याच्या भीतीने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याची शहानिशा करण्यासाठी वनरक्षक विजय शिंदे, वनपाल महेश मेरगेवाड, सीक्युएई सुरक्षा अधिकारी डी. पी. साना, स्थानिक प्राणीमित्र विनायक बडदे यांनी परिसराला भेट दिली. माहितीची पडताळणी केली असता बिबट्या नसल्याची खात्री करण्यात आली. याबाबत वनपाल महेश मिरगेवाड यांनी सांगितले की, परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे, केस, विष्ठा असे काहीही आढळून आले नाही. त्यामुळे नागरिकांनी पाहिलेला प्राणी हा 20 ते 30 किलो वजनाचा असल्याने तो बिबट्या नसून, रानमांजर असण्याची शक्यता वर्तविली आहे.
पिंपरी – औंध – सांगवी उपनगर लगतच्या संरक्षण खात्याच्या (सीक्यूएई) परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सीक्युएई प्रशासनाकडून सर्व कर्मचारी, रहिवाश्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सीक्युईने या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. आपण राहत असलेल्या जवळच्या परिसरात बिबट्याने दर्शन दिले असल्याचे कळताच सांगवीकर धास्तावले आहेत.
सीक्युएईमध्ये संरक्षण विभागासाठी फायर फायटिंग उपकरणे आणि रसायने तयार करण्यात येतात. सोमवारी (दि.13) सकाळी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि काही नागरिकांच्या माहितीनुसार बिबट्या दिसल्याचे स्पष्ट झाले आहे. सीक्युएई परिसरात 65 टक्के जंगल आणि 35 टक्के इमारतींचे बांधकाम आहे. मुळा नदीलगत आजू-बाजूला घनदाट लोकवस्ती असलेल्या भागात मधोमध संरक्षण विभागाची जागा आहे. येथे सीक्युई असून या परिसरात मोठे जंगलही आहे. या सांगवी उपनगराच्या भरवस्तीलगत बिबट्या दिसल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सीक्युएई प्रशासनाकडून लेखी परिपत्रकाद्वारे स्थानिक रहिवासी आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उन्हाळ्यामुळे दररोज काही नागरिक पहाटे आणि रात्री उशिरापर्यंत चालण्यासाठी या परिसरात येत असतात. गेल्या दोन दिवसांपासून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली.