यवत गावावर दुखवटा

नऊही मृत युवकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : बाजारपेठ बंद

यवत – पुणे-सोलापूर महामार्गावर येथील नऊ महाविद्यालयीन युववकांवर मध्यरात्री काळाने घाला घातला. या युवकांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. 20) दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुखवटा म्हणून ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेवली होती.

येथील नऊ महाविद्यालयीन तरुण शुक्रवारी (दि. 19) पहाटे रायगड व ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेले होते. परत इर्टीगा मोटार गाडीने यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गाने परतत असताना आज शनिवार (दि.20) रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर जवळील कदम-वाक वस्तीजवळ इर्टीगा मोटारगाडी व मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात इर्टीगातील सर्व 9 तरुणांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. या तरुणांच्या मृत्यूची बातमी समजताच यवत गावावर शोककळा पसरली तर यवत ग्रामस्थांनी दुखवटा म्हणून बाजारपेठ बंद ठेवत मृत युवकांना श्रद्धांजली वाहिली.

विशाल यादव, निखिल वाबळे, अक्षय घिगे, दत्ता यादव व अक्षय वायकर या पाच जणांवर यवत रेल्वे स्टेशन येथील स्मशानभूमीत तर सोनू उर्फ नुरमहंमद दाया, परवेज आत्तार आणि जुबेर मुलाणी या तिघांवर यवत येथील मुस्लीम दफनभूमीत दफन करण्यात आले. शुभम भिसे याच्यावर कासुर्डी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह अंत्यविधी वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दरम्यान, मृतांमधील बहुतेक तरुण अभियांत्रिकी महाविद्यालय व वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत होते.

तर दत्ता यादव व शुभम भिसे हे दोघे आई-वडिलांना एकुलते एक होते. युवकांच्या मृत्युची वार्ता यवत परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण गावांवर शोककळा पसरली. या तरुणांनी शिक्षण घेतलेले विद्या विकास मंदिर शाळा बंद ठेवण्यात आली होती. याच शाळेत यातील आठ जणांनी 2015मध्ये एकत्रित दहावीची परीक्षा दिली होती, या सर्व गोष्टींची माहिती सांगताना रहिवाशांचे अश्रू थांबत नव्हते. मृत युवकांचे मृतदेह गावातच येताच उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. यात कोणी आपला मुलगा, तर कोणी भाऊ कायमचा गमावला होता. तर महिलांनी केलेला आक्रोश यावेळी पडणाऱ्या मुसळधार पावसापेक्षा मोठा वाटत होता. तर गहिवरुन आलेल्या उपस्थितांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

दोन वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या…
अहमदनगर जवळ दि.25 मे 2017 रोजी झालेल्या बोलेरो जीप आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघातात यवतमधील सात जणांचा मृत्यू झाला होता. आजच्या अपघाताने दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताची आठवणी यवत ग्रामस्थांमध्ये ताज्या झाल्या आहेत. दोन वर्षातील दुसरा मोठा अपघात झाल्याने यवतकर ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

जिंदगी के साथ भी और बाद भी….
सगळे तरुण पहिलीपासून ते दहावीपर्यंत यवत येथील विद्या विकास मंदिर येथे एकत्र शिकत होते. तर आता दत्ता यादव उंड्री, पुणे येथे जेएसपीएमला इंजिनिअरिंगला होता, निखिल वाबळे हा विश्‍वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे बाऊन्सर म्हणून काम करीत होता. विशाल यादव जेएसपीएमला वाघोली येथे इंजिनिअरिंगला, शुभम भिसे हा उरुळी कांचन येथील महात्मा गांधी महाविद्यालयात बीसीएसला होता.

अक्षय घिगे हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बीएस्सीच्या शेवटच्या वर्षाला होता, सोनू उर्फ नूर महंमद दाया हा लोणी काळभोर येथील महाविद्यालयात बीएच्या दुसऱ्या वर्षाला होता, अक्षय वायकर हा दुचाकी गॅरेजचा व्यवसाय करीत होता, जुबेर मुलाणी हा खासगी नोकरी करीत होता तर परवेज आत्तार पूना कॉलेज इंजिनिअरिंगमध्ये शिकत होता. दरम्यान, लहानपणापासून एकत्र वाढलेल्या नऊही जणांना नियतीने एकाचवेळी आपल्या कवेत घेतल्याने “जिंदगी के साथ भी और बाद भी’ म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

“रेडी टू गो’ दुर्दैवाने खरे ठरले
यवतमधील हे नऊ जण शुक्रवारी (दि. 18) सकाळी रायगड किल्ल्यावर फिरायला निघाले होते, ते लोणी स्टेशन येथे आल्यावर या सर्वांनी महामार्गावरील एका हॉटेलसमोर उभे राहून एक सेल्फीही काढला होता. तर परवेज आत्तार याने लोणी काळभोर “रेडी टू गो’ असे लिहीत सर्व मित्रांचा सेल्फी आपल्या व्हॉट्‌सऍप स्टेटसला ठेवला होता.

आपली फिरायला जाण्याची तयारी झाली आहे अशा भावनेने परवेजने हा मजकुर लिहिला होता. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ज्या ठिकाणी या मित्रांनी हा फोटो काढून व्हॉटस्‌ऍप स्टेटसला ठेवला त्या ठिकाणापासून अवघ्या एकदीड किलोमीटर अंतरावरच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दरम्यान, हे नऊ जण वेगवेळ्या ठिकाणी काम व शिक्षण घेत असले तरी सुख, दु:खात कायम एकत्र होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)